झी टॅाकीज ओरिजिनलचा नवा हॅारर कॅामेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
टॅाकीज ओरिजिनलच्या माध्यमातून झी टॅाकीजने आजवर दर्जेदार चित्रपटांची मेजवानी आपल्या रसिकांना दिली आहे. आता पुन्हा एकदा वेगळ्या चित्रपटाची मेजवानी घेऊन झी टॅाकीज सज्ज झालं आहे. हॅारर कॅामेडी चित्रपट प्रेक्षकांना पहायला अधिक आवडतात. हे लक्षात घेऊन याच पठडीतला टॅाकीज ओरिजिनलचा ‘बेनवाड’ हा नवा हॅारर कॅामेडी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रविवार १३ फेब्रुवारीला दुपारी १२.०० वा. आणि सायंकाळी ६.०० वा. या चित्रपटाची मेजवानी प्रेक्षकांना घेता येईल. या चित्रपटाच्या निमित्ताने दोन दिग्गज कलाकार एकत्र झळकणार आहेत. आजचा आघाडीचा विनोदवीर भाऊ कदम आणि त्याच्या तोडीस तोड असणारा संदीप पाठक 'बेनवाड' मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
एखाद्या गावाच्या किंवा शहराच्या बाबतीतही काही दंतकथा असतात. बेनवाड हे असंच एक वेगळं नाव असलेलं गाव. या गावाची पण एक दंतकथा आहे. हे गाव एका विचित्र अशा शापात अडकले आहे. याच गावात संज्या आणि रंज्या हे दोन इरसाल भाऊ रहात असतात. संज्या आणि रंज्याच्या रूपात भाऊ कदम आणि संदीप पाठक प्रेक्षकांना भेटणार आहेत. बेनवाड गावाच्या रक्षणाची जबाबदारी संज्या आणि रंज्या यांच्याकडं सोपवण्यात येते. त्यानंतर काय आणि कशा गोष्टी घडतात? त्याला संज्या रंज्या कसे सामोरे जातात? आणि गावाला असलेल्या शापातून ते गावाची सुटका करू शकणार का? याची मजेशीर ‘रोलर कोस्टर राईड’ म्हणजे बेनवाड चित्रपट. दिग्दर्शक सुमित संघमित्र यांनी हे गुपित मनोरंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
'बेनवाड' मध्ये नेमकं काय घडतं? गावातील दंतकथेचा शोध घेण्यात हे दोन्ही क्रेझी भाऊ यशस्वी होतात का? ‘या सर्व प्रश्नांची उत्तरं संज्या आणि रंज्या या दोन इरसाल व्यक्तिरेखांच्या माध्यमातून 'बेनवाड' या चित्रपटामध्ये मिळणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांना प्रथमच भाऊ आणि संदीप या जोडीची अनोखी केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे. या दोघांसोबत त्यांच्या नायिकाही या चित्रपटात धमाल करताना दिसणार आहेत.
भूतकाळाच्या खुणा दाखवत वर्तमानकाळात गावात घडणाऱ्या विचित्र घटनांचा शोध घेऊ पहाणारा ‘बेनवाड’ हा हॅारर कॅामेडी चित्रपट असून आमच्या दोघांची वेगळी धमाल केमिस्ट्री यातून प्रेक्षकांना दिसेल, असं भाऊ कदम आणि संदीप पाठक सांगतात.
झी टॉकीज ओरिजिनलचा ‘बेनवाड’ हा चित्रपट शीर्षकापासून कथानकापर्यंत आणि अभिनयापासून सादरीकरणापर्यंत सर्वच बाबींमध्ये कुतूहल जागवणारा आहे. प्रेक्षकांना एका मनोरंजक सफरीवर घेऊन जाणार हा चित्रपट असून या प्रवासात प्रेक्षकांना भाऊ कदम, संदीप पाठक, कृतिका तुळसकर, राधा सागर, विजय निकम, शुभांगी भुजबळ, विजय पाटकर, संतोष शिंदे, रुक्मिणी सुतार, माधव अभ्यंकर, रमेश वाणी आदी कलाकार भेटणार आहेत.
रविवार १३ फेब्रुवारीला दुपारी १२.०० वा. आणि सायं. ६.०० वा. झी टॅाकीजवर दिसणारी 'बेनवाड' गावाची मजेशीर सफर पहायला विसरू नका.
No comments:
Post a Comment