नातेसंबंध हा मानवी जीवनाचा गाभा आहे. कोणतंही नातं टिकवण्यासाठी, ते खुलवण्यासाठी महत्त्वाचं असतं ते त्या नात्यात असणारं प्रेम. आजच्या काळात मात्र नातेसंबंध दुरावत असल्याचे आपण पाहतोय. बदलती सामाजिक परिस्थिती, भौतिक गरजा यामधून विसंवाद निर्माण होतो. तोच कारणीभूत ठरतो नात्यांमधील विद्रोहाला. हाच विसंवाद केंद्रस्थानी असलेला ‘तृषार्त’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ८ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘यशोभूमी एन्टरटेन्मेंटस’ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाच्या निर्मात्या सविता मोरे असून दिग्दर्शक अरुण मावनूर आहे.
कृष्णा आणि भाऊराव या दाम्प्त्याच्या आयुष्यावर ‘तृषार्त’ चित्रपटाची कथा बेतली आहे. काही माणसं नातेसंबंधांपासून पळ काढीत स्वतःचं एक वेगळं विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. कृष्णा आणि भाऊराव यांच्या मुलांनी ही स्वत:च वेगळं विश्व निर्माण केलं आहे. पती-पत्नीच्या नात्यातील वीण आणि मुलांच्या नात्यातील भावनिक द्वंद्व याचं चित्रण या चित्रपटात केलं गेलंय. कालानुरूप बदलत गेलेलीनात्यांची समीकरणं या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. ज्योती निवडुंगे, महेश सिंग राजपूत, अमूल भुटे, दिलीप पोतनीस, वृंदा बाळ, डॉ. जाधव, निलांगी रेवणकर, योगिता चौधरी, अक्षय वर्तक, निशांत पाथरे, विनया डोंगरे, मिलीषा जाधव, भूमी मोरे, लवेशशिंदे, चंद्रकांत मिठबावकर या कलाकारांच्या यात भूमिका आहेत.
‘तृषार्त’ चित्रपटाचे सहनिर्माते सुरेश कुमार सिंग आहेत. कथा आनंद म्हसवेकर व सुरेश प्रेमवती यांची असून पटकथा अरुण मावनूर आणि आनंद म्हसवेकर यांची आहे. संवाद आनंद म्हसवेकर यांनी लिहिलेत. चित्रपटातील गीते यशोधन कदम, वैभव चाळके आणि राहुल सोनावणे यांनी लिहिली आहेत. यशोधन कदम यांचे संगीत तर महेश नाईक यांचे पार्श्वसंगीत चित्रपटाला लाभले आहे. रवींद्र साठे, साधना सरगम, स्वप्नील बांदोडकर, संजय सावंत, डॉ. नेहा राजपाल,अंजली नांदगावकर, गीता गोलांब्रे, सुजाता पटवा, संचिता मोरजकर यांनी यातील गाणी गायली आहेत. कलादिग्दर्शन विजय मयेकर यांचे आहे. छायाचित्रण अविनाश सातोस्कर यांचे तर संकलन नासीर हाकीम अन्सारी यांनी केलेआहे. रंगभूषा शरद सावंत यांची आहे. संयोजन मिलिंद मोहिते यांचे आहे.
‘तृषार्त’ ८ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
No comments:
Post a Comment