Tuesday, March 7, 2017

छत्रपती शिवाजी महाराज अचिव्हमेंट अॅवॉर्ड २०१७ संपन्न



 ‘पीपल्स आर्ट्स सेंटर’ आयोजित ‘५ वा छत्रपती शिवाजी महाराज अचिव्हमेंट अॅवॉर्ड २०१७’ चा सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. विविध क्षेत्रात मौल्यवान योगदान देणाऱ्या १२ मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री. प्रकाश नाईक सोबत ज्येष्ठ अभिनेते श्री. विजू खोटे, मुंबई विद्यापीठ कला विभागाचे संचालक डॉ. मंगेश बनसोड, ज्येष्ठ निर्माता दिग्दर्शक श्री. विजय कोंडके उपस्थित होते. 

‘५व्या छत्रपती शिवाजी महाराज अचिव्हमेंट अॅवॉर्ड २०१७’पुरस्काराची सुरुवात आंतरराष्ट्रीय अॅथलिट   सिद्धार्थ थिंगालया यांना सन्मानित करून करण्यात आले. वयाच्या १२ व्या वर्षापासून जिद्दीने खेळणाऱ्या सिद्धार्थ यांनी अल्पावधीत अॅथलेटिक्समध्ये विविध पारितोषिकांवर नाव कोरत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. ‘टूर्स आणि ट्रॅव्हल्स’च्या क्षेत्रात स्वतःच्या हिमतीच्या बळावर मह्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या श्री. सदाशिव शेट्टी यांना पर्यटन क्षेत्रासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच श्री. मुरली देवल्ला (Infrastructure Expert) यांना पायाभूत सुविधामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. यानंतरचा पुरस्कार कॅटरिंग क्षेत्रात स्वादिष्ट अन्न पुरविणारे श्री. जयराम शेट्टी यांना देण्यात आला.

गायन क्षेत्रातील भरीव योगदानासाठी श्री. गणेश कुमार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. भक्ती संगीत विविध भाषांमध्ये गाऊन त्यांनी ‘बहुभाषिक भक्तीगीत गायक’ अशी आपली ओळख निर्माण केली आहे. खडतर परिस्थितीत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिक्षणतज्ञ श्री. व्ही. देवदासन यांना प्रदान करण्यात आला. ख्यातनाम बालरोग तज्ञ डॉ. दिव्यलता एस. वॉरियर यांना देखील ‘५ व्या छत्रपती शिवाजी महाराज अचिव्हमेंट अॅवॉर्ड २०१७’ च्या पुरस्काराने गौरविण्यात आले. सामाजिक भान जपत त्यांनी लहान मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. ज्येष्ठ सिनेपत्रकार–लेखिका उदया तारा नायर यांना तसेच ज्येष्ठ उद्योगपती श्री. के. नंदकुमार यांना उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

चित्रपट व मनोरंजन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. श्रीकांत भासी यांनाही विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. विविध व्यवसायात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. शशी किरण शेट्टी यांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले. न्याय आणि विधी क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी ज्येष्ठ न्यायमूर्ती जस्टीस बी. एन. श्रीकृष्ण यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामान्य माणसांना जलद गतीने न्याय प्रदान करण्यात नेहमीच सक्रीय असणारे न्यायाधीश म्हणून त्याची विशेष ओळख असून अनेक गाजलेल्या खटल्यांमध्ये त्यांचे निर्णय मोलाचे ठरले आहेत. अशा विविध मान्यवरांना ‘५ व्या छत्रपती शिवाजी महाराज अचिव्हमेंट अॅवॉर्ड २०१७’ च्या पुरस्काराने गौरविण्यात आले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 

No comments:

Post a Comment