पूर्वी अनेकदा गोष्टींची सुरुवात ‘एक होता राजा आणि एक होती राणी’ अशी व्हायची. त्या राजा-राणीच्या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या असल्या तरी आधुनिक युगातल्या एका ‘राणी’ची गोष्ट घेऊन एक मराठी चित्रपट येतोय. स्वरूप समर्थ एन्टरटेन्मेंट आणि योगेश निवृत्ती भालेराव प्रस्तुत‘एक होती राणी’ हा प्रसाद तारकर दिग्दर्शित चित्रपट १९ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
योगेश निवृत्ती भालेराव निर्मित ‘एक होती राणी’ हा चित्रपट नेहमीच्या प्रेमपटांपेक्षा हटके आहे. या गोष्टीतील सलील आणि राणीच्या प्रेमाची अनपेक्षितरित्या बांधली गेलेली गाठ या दोघांना एकत्र आणते का..? अनोळखी नात्यापासून सुरु झालेला सलील आणि राणीचा हा भावनिक प्रवास त्यांना कुठवर घेऊन जातो..? त्यांचे प्रेम यशस्वी होते का..? या साऱ्या रोमांचकारी प्रश्नांचा उलगडा ‘एक होती राणी’ मधून होणार आहे.
चित्रपटातील मध्यवर्ती भूमिकेत अनिकेत विश्वासराव आणि मीनल घोरपडे दिसतील तर उदय टिकेकर, किशोरी आंबिये, उषा नाडकर्णी, अश्विनी एकबोटे, कमलाकर सातपुते, अरुण कदम, गायत्री देशमुख, मेघा धाडे आणि नेहा ठाकूर या कलाकारांच्या भूमिका ही यात पाहायला मिळणार आहेत. ‘एक होती राणी’ या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण गोव्यात झाले असून तेथील रम्य निसर्ग सौंदर्याचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे.
महेंद्र पाटील यांनी ‘एक होती राणी’ चित्रपटाची कथा लिहिली आहे तर छायांकन सिथाराम संधीरी यांचे असून बंटी सैनी यांनी चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे. ‘एक होती राणी’हा एक संगीतमय प्रेमपट असून यात वेगवेगळ्या जॉनरची पाच गीते आहेत. सलील अमृते यांच्या संगीताने सजलेल्या या चित्रपटाची गीते अश्विनी शेंडे, धनश्री कुंभार, निलेश लोटणकर यांनी शब्दबद्ध केली आहेत तर महालक्ष्मी अय्यर, शान, हृषिकेश कामेरकर, जान्हवी प्रभू अरोरा, निशा यांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे.
आधुनिक राजा-राणीच्या प्रेमाची गोष्ट सांगणारा ‘एक होती राणी’ १९ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे.
No comments:
Post a Comment