Friday, December 18, 2015

समृद्धी पोरे दिग्दर्शित ‘हेमलकसा’ हिंदी चित्रपट ऑस्करच्या फायनलमध्ये दाखल



‘डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो’ या मराठी चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर समृद्धी पोरे यांनी ही फिल्म्स जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हिंदीत बनवण्याचा निर्णय घेतला आणि परत शुटींग करून डॉ. आमटेंच्या जीवनावर हिंदीत ‘हेमलकसा’ या नावाने सिनेमा बनवला.

‘हेमलकसा’ सिनेमाचे भाग्य एवढे मोठे ठरले की ‘हेमलकसा’ हा हिंदी सिनेमा ऑस्करच्या फायनल राउंडमध्ये जाऊन पोहोचला आहे. गेल्या ३-४ महिन्यांपासून अनेक सोपस्कार आणि विविध परीक्षांतून सिनेमा पुढे-पुढे जात होता. लॉसएंजलिसमध्ये मागच्या महिन्यात सिनेमाचे ज्युरींसाठी अनेक शोज् झालेत त्यात तो ऑस्करच्या फायनल राउंडमध्ये जाण्याच्या पात्रतेचा असल्याचे शिक्कामोर्तब झाले.

‘८८ व्या अॅकेडमी अॅवार्डस’ फॉरेन लँग्वेज कॅटगरीमध्ये ‘कोर्ट’ (मराठी) तर ओपन कॅटगरीमध्ये ‘हेमलकसा’ (हिंदी), ‘नाचोमिया कुम पसार’ (कोकणी फिल्म), ‘जलम’ (मल्याळम) आणि रंगी तरंग (कन्नड) या पाच चित्रपटांची निवड करण्यात आली होती. भारताकडून पाठवण्यात आलेला ‘कोर्ट’ चित्रपट स्पर्धेतून बाद झाला असला तरी शेवटपर्यंत टिकून राहण्याचा मान ‘हेमलकसा’ या एकमेव हिंदी चित्रपटाने पटकावला आहे.‘हेमलकसा’ ही समृद्धी पोरेंची पहिलीच हिंदी फिल्म असून पदार्पणातच जगातल्या सर्वोत्तम चित्रपटाच्या यादीत जाण्याचा बहुमान त्यांना लाभला आहे. बेस्ट फिल्म, बेस्ट अॅक्टरआणि बेस्ट अॅक्ट्रेस या तीन विभागांमध्ये ‘हेमलकसा’ ची चुरस इतर चित्रपटांसोबत रंगणार आहे.

‘हेमलकसा’ या चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद अॅड. समृद्धी पोरे यांनी लिहिलेत तसेच दिग्दर्शनाची ही जबाबदारी लीलया पेलली आहे. चित्रपटाची निर्मिती समृद्धी पोरे यांनी त्यांच्या समृद्धी सिने वर्ल्ड या कंपनी अंतर्गत केली आहे. ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो’ या गाजलेल्या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसलेले नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी ‘हेमलकसा’ या हिंदी चित्रपटातही प्रमुख भूमिकेत दिसतील. नाना पाटेकरांच्या हिंदी चित्रपट कारकिर्दीतला अतिशय आगळा-वेगळा चित्रपट ठरेल यात शंका नाही. 

No comments:

Post a Comment