लघुपटांना मिळणार दर्जेदार व्यासपीठ
महाराष्ट्राची नस अचूक ओळखणाऱ्या 'झी टॉकीज'ने कलात्मकता आणि व्यावसायिकतेची योग्य सांगड घालत अनेक उपक्रमांनी आजवर रसिकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. ‘टॉकीज लाईट हाऊस’ हा असाच एक आगळा वेगळा उपक्रम घेऊन 'झी टॉकीज' आता लघुपटांसाठी एक नवं दालन खुलं करणार आहे. मराठीत तसेच जगभरात तयार होणाऱ्या उत्तम लघुपटांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी एखाद्या वाहिनीने पुढाकार घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘टॉकीज लाईट हाऊस’ या नावाची सुद्धा एक खासियत आहे. टॅलेंट असूनही प्रकाशात नसलेल्या कलाकर्मींना प्रकाशझोतात आणणार व्यासपीठ म्हणून या उपक्रमाचं नाव ‘टॉकीज लाईट हाऊस’ असं ठेवण्यात आलं आहे.
लघुपट हे सर्जनशील अभिव्यक्ती व प्रयोगाचे माध्यम आहे. आपल्याला जे भावलं, आवडलं ते कॅमे-यात बंदिस्त करायला आजच्या युवा वर्गाला खूप आवडतं. एखादा माहितीपट तरी करावा, अशी अनेक तरुणांची इच्छा असते. या लघुपटासाठीची साधनं आज सहज उपलब्ध आहेत. मात्र तयार झालेल्या या लघुपटांना योग्य व्यासपीठच नसल्याने अनेक चांगले लघुपट रसिकांपर्यंत पोहचत नाही. हीच बाब हेरून 'झी टॉकीज' नव्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळवून देण्याच्या उदिष्टाने ‘टॉकीज लाईट हाऊस’ हा आगळा वेगळा उपक्रम सुरु करणार आहे.
चांगला आशय असेल, तर तो लघुपटांच्या माध्यमातून कमी वेळेत लोकांपर्यंत पोचविला जाऊ शकतो. स्थानिक ते जागतिक पातळीपर्यंत सर्व विषयांना स्पर्श करण्याची ताकद बाळगणारे लघुपट हे एक प्रभावी माध्यम आहे. एखादा विषय कमीतकमी वेळात प्रेक्षकांसमोर मांडण्याचे कसब ह्या लघुपटांतून साधता येते. मराठी चित्रपट क्षेत्रात तरुणाई नवनवीन प्रयोग करण्यात व्यग्र आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आशयघन आणि दर्जेदार चित्रनिर्मिती होत असून या लघुपट कलाकृती सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत. नवकलाकारांना व तंत्रज्ञानांना आपली प्रतिभा व प्रगल्भता सादर करण्याचे मुक्त व्यासपीठ व मराठी चित्रपटाकडे प्रेक्षकांना आकर्षित करण्याचे काम लघुपट महोत्सवांतून होत असते. 'झी टॉकीज'च्या या उपक्रमामुळे सध्याचं सर्वात प्रभावी माध्यम लघुपटांना उपलब्ध होणार असून याचा फायदा नव्या प्रतिभेला होईलचं पण चांगल्या कलाकृतीही रसिकांना पहायला मिळतील.
महाराष्ट्राची नंबर वाहिनी असलेल्या 'झी टॉकीज 'च्या या उपक्रमामुळे लघुपटासाठी हक्काचं व्यासपीठ निर्माण होणार आहे. मराठी तसेच जगभरातील वेगवेगळ्या भाषेतील निवडक लघुपट कलाकृतीं 'झी टॉकीज'वर प्रेक्षकांना पहाता येतील. सुरवातीच्या भागांमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते ख्यातनाम दिग्दर्शकांच्या लघुपटांचा यात समावेश असेल. दाखवण्यात येणाऱ्या लघुपटाच्या वेळी दिग्दर्शकाचा लघुपट बनवण्यामागचा विचार तसेच दिग्दर्शकाला लघुपट करताना व तो प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात आलेल्या अडचणीसुद्धा जाणून घ्यायला मिळणार आहे. लघुपटांच्या स्क्रीनिंगसोबतचलघुपट मार्गदर्शनाची कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. चित्रपटक्षेत्रात येवू पाहणाऱ्या उत्साही आणि हौशी तरूणांना ही कार्यशाळा म्हणजे एक सुवर्णसंधी असेल. याच दरम्यान लघुपटांसाठी प्रवेशिका मागवत इच्छुक नव्या दिग्दर्शकांना लघुपट तयार करण्याची संधी दिली जाणार आहे. 'यानंतरच्या भागात लघुपट महोत्सव आयोजित केला जाणार असून शॉर्ट फिल्म् विजेत्याची घोषणा या महोत्सवाच्या वेळी करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या वेळी नामवंत दिग्दर्शकांचे अनुभवांचे बोल सर्वांनाच जाणून घ्यायला मिळतील. झी टॉकीजवर ‘टॉकीज लाईट हाऊस डे’ असा एक विशेष दिवस साजरा केला जाणार आहे. या नव्या अंदाजातल्या ‘टॉकीज लाईट हाऊस’ डे’ मध्ये स्पर्धेतल्या निवडक लघुपटांसोबत विजेता लघुपट दाखवण्यात येईल.
कमी वेळेत अचूक आणि प्रभावी संदेश देण्याचं काम लघुपट करतात. तरुणांच्या प्रतिभेला हक्काचं व्यासपीठ मिळावं, इंडस्ट्रीला उत्तम दिग्दर्शक मिळावे या हेतूनं आम्ही हा उपक्रम सुरु करणार असल्याचं 'झी टॉकीज'चे बिझनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितलं. एका कथेच्या माध्यमातून या शॉर्ट फिल्म्स दाखवल्या जाणार असून प्रायोगिक तत्वावर सुरु होणाऱ्या या प्रोजेक्टला प्रेक्षकांचा नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास ही बवेश जानवलेकर यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment