Friday, August 28, 2015

गप्पांच्या मैफलीतून उलगडणार निशिकांत कामत यांचा दिग्दर्शकीय प्रवास


डॉ. व्ही शांताराम मोशन पिक्चर ट्रस्टचा उपक्रम


व्ही शांताराम सिने कल्चरल सेंटरच्या उपक्रमांतर्गत सिनेमा मेकिंगचे तंत्र आणि विविध विषयांवरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमाचे चौथे सत्र रविवार ३० ऑगस्टला आयोजित करण्यात आले असून प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे मौल्यवान मार्गदर्शन सभासदांना लाभणार आहे.
निशिकांत कामत, दिग्दर्शन क्षेत्रातलं एक मोठं नाव. आपल्या प्रत्येक कलाकृतीतून त्यांनी नेहमीच काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. डोंबिवली फास्ट, लय भारी, मुंबई मेरी जान, फोर्स, दृश्यम असा त्यांचा कामगिरीचा आलेख चढता राहिला आहे. सिनेमा माध्यमाकडे अतिशय गंभीरपणे पाहाणा-या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये निशिकांत कामत यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

या मराठमोळ्या दिग्दर्शकाबरोबर गप्पांची खास मैफील येत्या रविवारी ३० ऑगस्टला  दुपारी २.३० वाजता रविंद्र नाट्यमंदिर मिनी थिएटर येथे रंगणार आहे. अधिकाअधिक चित्रकर्मींनी या परिसंवादाचा लाभ घ्यावा असे आवाहन या उपक्रमाचे संकल्पनाकार हर्षल बांदिवडेकर यांनी केले आहे. याआधी नितीन देसाईमधुर भंडारकर,आशुतोष गोवारीकर यांच्या सोबतच्या परिसंवादाना चित्रकर्मींचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.

निशिकांत कामत यांचा दिग्दर्शन अनुभवाचे बोल चित्रकर्मींसाठी नक्कीच मोलाचे ठरतील असा विश्वास डॉ. व्ही शांताराम ट्रस्टचे अध्यक्ष श्री. किरण शांताराम यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment