'स्वच्छ भारत अभियान' या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोहिमेला देशभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. 'एक कदम स्वच्छता की ओर...' या एका घोषवाक्याने जनमानसात स्वच्छतेविषयी जागृती निर्माण केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा सुधारण्यास कारणीभूत ठरणारा स्वच्छतेचा हा नारा आता रुपेरी पडद्यावरही घुमणार आहे. दिग्दर्शक रोहित आर्य यांच्या आगामी 'लेट्स चेंज' या हिंदी डॉक्युड्रामाच्या माध्यमातूनप्रेक्षकांना 'स्वच्छता अभियाना' ची जादू पाहायला मिळणार आहे.
कोणताही देश सुधारण्याची ताकद मुलांमध्ये तसंच तरुणांमध्ये असते. त्यामुळेच बालवयातच स्वच्छेतेचे संस्कार झाले तर भविष्यात 'स्वच्छ भारत, सुंदर भारत' हे स्वप्न नक्कीच साकार होईल. मुलांच्या माध्यमातून हे संस्कार घराघरात पोहोचतील. तिथूनच ते पुढे समाजापर्यंत पोहोचतील या जाणीवेतून दिग्दर्शक रोहित आर्य यांनी 'लेट्स चेंज' या डॉक्युड्रामाचं दिग्दर्शन केलं आहे. आर्य यांच्या या कार्यात डॉ. रघुनाथ माशेलकर तसंच टाटा मोटर्स यांनीही सहभाग घेतला आहे.
समाजात आमूलाग्र बदल घडविण्याच्या दृष्टिने विचार करून आकाराला येणाऱ्या 'लेट्स चेंज' या डॉक्युड्रामाची कथा लहान मुलांवर आधारित आहे. स्वच्छतेचा मंत्र घराघरात पोहचविण्यासाठी या चित्रपटातील मुलं एक मोहिम राबवतात. हळूहळू त्यांच्या या मोहिमेची जादू सर्वदूर पसरते आणि त्यांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ होतो. हा प्रयोग प्रत्यक्षात केल्यानंतर रोहित आर्य आता तो डॉक्युड्रामाच्या माध्यमातून समाजासमोर आणणार आहेत. त्यामुळे कुठेही उपदेशाचे डोस न पाजता 'लेट्स चेंज' मध्ये अतिशय मनोरंजक पद्धतीने एक महत्त्वाचा विषय मांडण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये हा डॉक्युड्रामा दाखवण्याची योजना आर्य यांनी आखली आहे.
या अभियानाअंतर्गत मुंबईत नुकताच एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, प्रेम चोप्रा, मुकेश खन्ना, शिक्षण समितीच्या अध्यक्षा रितू तावडे,महानगरपालिकेचे आयुक्त अजय मेहता महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment