Sunday, September 7, 2014

'गुरु-पौर्णिमा' १२ सप्टेंबरला चित्रपटगृहात

प्रेमकथेचा विषय असलेले चित्रपट कायमच प्रेक्षकांना भुरळ घालत आले आहेत. मग ती किशोरवयीन अल्लड प्रेमकथा असो वा तारुण्यातली हळूवार लवस्टोरी... वयाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेम नव्याने उलगडतं आणि प्रगल्भ होत जातं. प्रेमाचे बदलते रंग आणि त्यात येणारी सुख - दुखः प्रत्येक प्रेमिकाच्या आयुष्यात निरनिराळी स्थित्यंतर घेऊन येतात. शब्दांपलीकडे व्यक्त होणाऱ्या अशाच गहिऱ्या प्रेमाची 'लव्हेबल' गोष्ट घेऊन 'श्रीहित प्रॉडक्शन' निर्मिती संस्थेचा 'गुरु पौर्णिमा' हा मराठी चित्रपट येत्या १२ सप्टेंबरला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय. मेघना मनोज काकुलो निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केलंय. 
      
उपेंद्र लिमये आणि सई ताम्हणकर यांच्या अभिनयाची आजवरची वेगळी झलक 'गुरु पौर्णिमा' या सिनेमात प्रेक्षकांना पहाता येणार आहे. चित्रपटात उपेंद्र लिमये, सई ताम्हणकर यांच्यासह हिंदीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा आर्य, सुशांत नायक, राजीव हेडे, विधीता काळे या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. 'गुरु पौर्णिमा'च्या निमित्ताने दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी प्रथमच प्रेमकथेचा विषय हाताळला असून प्रेमाची आगळीवेगळी गोष्ट प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. गुरु आणि पौर्णिमा यांच्यातील खिळवून ठेवणारी हृदयस्पर्शी कथा स्वप्नील गांगुर्डे यांनी लिहिली असून पटकथा-संवाद जितेंद्र देसाई यांनी लिहिले आहेत. परेश नाईक 'गुरु पौर्णिमा' चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. 

चित्रपट प्रेमकथेवर आधारित असल्याने यातील गीतात आणि संगीतात व्हेरिएशन पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे संगीत तरुणाईला ताल धरायला लावणारं असून वैभव जोशी, अनुराधा राजाध्यक्ष, विश्वजीत, सत्यजीत रानडे लिखित यातील गीतांना युवा संगीतकार अविनाश- विश्वजीत या जोडीने संगीत दिले आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या गायिका बेला शेंडे व गायक स्वप्नील बांदोडकर, स्वरूप भालवणकर, संदीप उबाळे, नेहा राजपाल, श्रावणी रविंद्र यांच्या सुरेल आवाजात ही गीते स्वरबद्ध झाली आहेत. चित्रपटाचे छायांकन संतोष शिंदे यांनी केले असून संकलन निलेश गावंड यांचे आहे. कलादिग्दर्शन - प्रशांत राणे, नृत्य दिग्दर्शन - सोनिया परचुरे, रंगभूषा- अमोद दोषी, वेशभूषा- शिल्पा कोयंडे अशी इतर श्रेयनामावली आहे. प्रेमाची हृदयस्पर्शी कथा असलेला, 'गुरु पौर्णिमा' चित्रपट येत्या १२ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

No comments:

Post a Comment