सुपरस्टार आमीर खानच्या उपस्थितीत रंगला 'सॅटर्डे सण्डे'चा स्पेशल शो
हिंदीतील ख्यातनाम दिग्दर्शकांच्या शुभेच्छा लाभलेला मकरंद देशपांडे दिग्दर्शित मराठीतला पहिला गँगस्टर चित्रपट 'सॅटर्डे सण्डे' चा दिमाखदार विशेष शो नुकताच मुंबईत संपन्न झाला. बॉलीवूड सुपरस्टार आमीर खान यांची विशेष उपस्थिती हे या 'शो' चे खास आकर्षण ठरले. चित्रपटातील कलाकार - तंत्रज्ञांसह,
सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आमीर खान यांनी या मराठी सिनेमाचा आस्वाद घेतला. मराठी रसिकांचे सिनेमा प्रेम आणि चाहत्यांची गर्दी यामुळे आमीर भारावून गेले होते. हा चित्रपट पाहिल्यावर आमीर खान यांची पहिली प्रतिक्रिया होती ती म्हणजे 'सॅटर्डे सण्डे' सिनेमा नक्कीच सुपरहिट होणार', सिनेमात अॅक्शन, इमोशन आणि यात असणाऱ्या विविध व्यक्तिरेखामुळे हा सिनेमा खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे'. शिवाय यावेळी त्यांनी 'उत्तम संहिता समोर आली तर भविष्यात मी मराठी चित्रपटातही काम करेन' असेही मनोगत व्यक्त केले.
'अश्विनी राहुल इंटरप्रायजेस' निर्मिती संस्थेचा हा सिनेमा ८ ऑगस्टला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय. बॉलीवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट अशी ख्याती असलेल्या आमीर खान यांच्या पसंतीची पावती 'सॅटर्डे सण्डे' ला मिळाल्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन नक्कीच धूमधडाक्यात होणार असा मानस दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. चित्रपटाची कथा गुन्हेगारी पार्श्वभूमीवर बेतलेली असल्याने प्रेक्षकांना यात इमोशन, ड्रामा आणि अॅक्शनची 'फुल ऑन ट्रीट' असणार आहे. स्वप्नील नाचणे यांचे तरुणाईला थिरकायला लावेल असे आधुनिक शैलीतील संगीत असलेला हा चित्रपट मराठी रसिकांसाठी आजवरचा वेगळा अनुभव असणार आहे. मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, नागेश भोसले, नेहा जोशी, अमृता सुभाष, अमृता संत, असीम हट्टंगडी, संदेश उपशाम, उमेश जगताप, मुझामिल कुरेशी, इम्रान शेख, विक्रम दहिया, नचिकेत जोशी, शैलेश हेजमाडी, श्रेयस पंडीत, अजय मोर्या या कलाकारांचा भन्नाट अदाकारी 'सॅटर्डे सण्डे' चित्रपटात पहायला मिळणार आहे.
चित्रपटाच्या घोषणेपासून ट्रेलर प्रकाशित होईपर्यंत प्रत्येक सोहळ्यास हिंदीतील सुप्रसिद्ध निर्माता - दिग्दर्शकांची विशेष उपस्थिती हे या चित्रपटाचे आकर्षण ठरले. सिनेमा प्रदर्शित होण्याच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या या 'स्पेशल शो' ला खुद्द आमीर खान यांनी उपस्थिती लावून या सिनेमाची शान अधिकच वाढवली. ८ ऑगस्टला प्रदर्शित होणारा हा सिनेमा रसिकांचा 'सॅटर्डे सण्डे' निश्चितच स्पेशल करेल.
No comments:
Post a Comment