Saturday, May 3, 2014

दिलीप प्रभावळकरांनी गाठली अनोखी उंची

दिलीप प्रभावळकरांनी गाठली अनोखी उंची  


लेखन, नाटक, मालिका, एकपात्री, चित्रपट अशा विविध माध्यमांद्वारे, आपल्या उत्तम प्रतिभाविष्कारांतून दिलीप प्रभावळकरांनी समस्त प्रेक्षकवर्गाला आपलंसं केलंय. वेगवेगळ्या कलाकृतींतील संस्मरणीय व्यक्तीरेखांद्वारे अभिनयाची उच्चतम उंची गाठणाऱ्या या अवलियाने आगामी 'जयजयकार' चित्रपटातल्या आपल्या व्यक्तिरेखेसाठी अशीच एक वेगळी उंची गाठलीयआजवरच्या त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी विनोदी, गंभीर, आक्रमक, मवाळ, अशा विविध छटांच्या भूमिका लीलया साकारल्यात. त्यांच्या अभिनयाची हिच खासियत आगामी 'जयजयकार' चित्रपटात प्रेक्षकांना पहाता येणार आहे. 'शुन्य क्रिएशन्स' निर्मित या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन शंतनू गणेश रोडे यांनी केलंय.   

आपल्यातील अभिनेत्याला नेहमीच आव्हान देणाऱ्या दिलीप प्रभावळकर यांनी 'जयजयकार' या आगामी सिनेमात एका विशाल दगडावर, बाजूला खोल दरी आणि खाली विस्तीर्ण नदी अशा अवघड ठिकाणी चक्क २० फुट उंचीवर जाऊन शॉट दिला आहे. त्यांनी या वयात दाखविलेली सहजता तरुणांना निश्चितच लाजवेल अशीच म्हणावी लागेलया चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी सेवानिवृत्त मेजर श्री. अखंड या वयोवृद्ध व्यक्तीची भूमिका साकारलीय. विनोदी खेळकर स्वभावाच्या अखंड यांची एका तृतीयपंथी टोळीशी भेट होते, त्यानंतर अनपेक्षित घटनांची मालिकाच सुरु होतेचित्रपटात दिलीप प्रभावळकर यांचा वेगळा लूक असून कुरळ्या केसांसोबत झुबकेदार मिशा असलेले मिश्किल दिलीपजी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेततृतीयपंथीयांचे जीवन समजून घेत त्यातून जगण्याची व्याख्या उलगडून सांगणारा हा चित्रपट नक्कीच वेगळा ठरणार आहे. लेखक म्हणून सुपरिचित असणाऱ्या शंतनू रोडे यांनी या सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे. 'फेथ इन्कॉर्पोरेट मुव्हीज प्रा. लि.' प्रस्तुत, 'जयजयकार'ची निर्मिती राहुल कपूर, शंतनू गणेश रोडे, चंद्रशेखर नन्नावरे यांनी केली असून संजय कौल चित्रपटाचे सह निर्माते आहेत

कोणत्याही भूमिकेत शिरण्यासाठी दिलीप प्रभावळकर यांचा असणारा उत्साह आणि तयारी नवोदित कलाकारांसाठी नक्कीच शिकण्यासारखी आहे. या सिनेमात देखील त्यांचा उत्स्फूर्त अभिनय पहाता येईल. तृतीयपंथीयांच्या भावविश्वात डोकावण्याचा प्रयत्न 'जयजयकार' मध्ये करण्यात आला असून 'आपण जर ठरवलं तर कोणत्याही संकटातून सहज मार्ग काढू शकतो' हा मोलाचा संदेश हा चित्रपट देतो. 'जयजयकार' मध्ये दिलीप प्रभावळकर यांच्यासह सुहिता थत्ते, संजय कुलकर्णी, भूषण बोरगांवकर, धवल पोकळे, आकाश शिंदे या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. प्रत्येक भुमिकेला वेगळी उंची देणारे दिलीप प्रभावळकर यांची अशीच लक्षवेधी भूमिका असलेला 'जयजयकार' येत्या जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.  





No comments:

Post a Comment