‘गांव थोर पुढारी चोर’ चित्रपटाचा मुहूर्त अण्णा हजारे यांच्या
हस्ते संपन्न
बलशाली भारताचे स्वप्न साकार करायचे असेल तर गावपातळीवर काम करणे आवश्यक आहे.
तसेच व्यक्तिगत पातळीवर बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायला हवा. या प्रयत्नांमधूनच देश बदलू शकतो आणि विश्वशांती प्रस्थापित होऊ शकते.
यासाठी कला हे माध्यम चांगले काम करू शकते असे मत ज्येष्ठ समाजसेवक,
पद्मभूषण अण्णा हजारे यांनी नुकतेच व्यक्त केले.
मंगेश मुव्हिज् एंटरप्रायझेस प्रस्तुत ‘गांव थोर पुढारी चोर’ या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त अण्णा हजारे यांच्या शुभहस्ते दौंड परिसरातील वाळकी या गावात नुकताच संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी निर्माते-दिग्दर्शक पितांबर काळे,
निर्माते मंगेश डोईफोडे,
अभिनेत्री प्रेमा किरण,
अभिनेता चेतन दळवी यांच्यासह चित्रपटातील सर्व प्रमुख कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.
कला या माध्यमाच्या समाज परिवर्तनामधील भूमिकेविषयी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की,
कला हे केवळ मनोरंजन नसून ते एक सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आहे
हा दृष्टीकोन ठेवून सध्याच्या कलाकारांनी काम करणे आवश्यक आहे.
आपल्या स्वतंत्र भारतात जनता ही या देशाची मालक आहे आणि पुढारी मंडळी सेवक आहेत हे चित्रच मुळात उलटे झाले आहे.
ते बदलण्यासाठी अशा चित्रपटांची,
साहित्यांची, कलाकृतींची समाजाला गरज आहे.
यातूनच जनतेला प्रेरणा मिळेल अशी भावनाही अण्णा हजारे यांनी यावेळी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment