'एकता एक पॉवर'चे म्युझिक लॉन्च संपन्न
एकीमध्ये मोठी ताकद असते. एखाद्या
समूहाने विचारपूर्वक, जबाबदारीने केलेली कोणतीही कृती नेहमीच लक्षवेधी
ठरते, मग ते देशाचे राजकारण असो वा मैदानावरचा खेळ. एकदा का मनात आणलं तर
कोणतीही गोष्ट अशक्य नाही. धर्म, भाषा, रितीरिवाज यापलीकडे माणूसकी आणि
त्याच्या एकीचे बळ नेहमीच श्रेष्ठ आहे. एकीचे महत्व अधोरेखीत करीत हा विषय
वेगळ्या पद्धतीने 'एकता एक पॉवर' या मराठी चित्रपटात मांडण्यात आलाय. 'राहुल इंटरप्रायजेस' प्रस्तुत, 'अश्विनी
राहुल इंटरप्रायजेस' चित्रपट निर्मिती संस्थेच्या अश्विनी सिरसाट निर्मित
'एकता एक पॉवर'चे दिग्दर्शन के. विलास यांनी केलंय. ३० मे ला हा चित्रपट
सर्वत्र प्रदर्शित होणार असून त्यापूर्वी यातील गीतांची ध्वनीफित मुंबईचे
महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते सिनेमातील कलाकार व तंत्रज्ञांच्या
उपस्थितीत प्रकाशित करण्यात आली. 'अल्ट्रा डिस्ट्रीब्यूटर्स' चे जयेश वीरा
यांच्यातर्फे हि ध्वनिफीत प्रकाशित करण्यात आली असून यावेळी निर्माते-
दिग्दर्शक मकरंद देशपांडे उपस्थित होते.
'एकता
एक पॉवर' या चित्रपटातून सामाजिक एकात्मतेचे महत्त्व सांगणारी कथा
रेखाटण्यात आली असून या चित्रपटात राजेश शृंगारपुरे, स्मिता शेवाळे, मौसमी
तोंडवळकर, विद्याधर जोशी, श्रीकांत शिंदे, श्याम ठोंबरे, श्रद्धा सागांवकर,
अनुप चौधरी, स्नेहल कांबळे या कलाकारांच्या भूमिका आहेत. दिग्दर्शक के.
विलास यांनीच चित्रपटाचे लेखन केले असून संवाद ज्ञानेश्वर आंगणे यांनी
लिहिलेत. के. विलास यांनी लिहिलेल्या चित्रपटातील चार गीतांना सलील अमृते
यांचं संगीत लाभलं असून यात वेगवेगळ्या शैलीतील गीतांचा समावेश आहे. यातील
'एकता एक पॉवर' हे शीर्षक गीत गायक नंदेश उमप आणि नेहा राजपाल यांनी गायलं
असून 'प्रेम झालं ग मला' हे प्रेमगीत स्वप्निल बांदोडकर व किर्ती किल्लेदार
यांच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे. चित्रपटात एक 'कबड्डी' सॉंग असून
गायक आदर्श शिंदे यांच्या जोशिल्या आवाजात ते स्वरबद्ध झालंय.
यासोबतच रेश्मा सोनावणे यांच्या ठसकेदार आवाजातील 'पाव्हणं लाईन मारने का
नई' हे आयटम सॉंग धमाल उडवून देणार आहे. मानसी नाईक यांच्यावर चित्रीत
झालेल्या या गीताचे नृत्य दिग्दर्शन 'डी आय डी' फेम सिद्धेश पै यांनी केलं
आहे.
चित्रपटाचे
छायाचित्रण गोपाल डे यांनी केले असून नृत्य दिग्दर्शन विहार घाग, अनिल
सुतार, सिद्धेश पै, राजेश पडवळे यांनी केलंय. राज सुर्वे यांनी चित्रपटाचे
संकलन केले असून कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी राजेंद्र व सचिन शिंदे
यांनी सांभाळली आहे. येत्या ३० मे ला 'एकता एक पॉवर' चित्रपट राज्यात
सर्वत्र प्रदर्शित होतोय त्यापूर्वी यातील गीते प्रेक्षकांना नक्कीच ठेका
धरायला लावतील.
No comments:
Post a Comment