मुंबई, 10 जानेवारी 2024: दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत मुंबईतील सत्राची अखेर यु मुंबा आणि हरियाणा स्टिलर्स यांच्यातील सामना चुरशीच्या लढतीनंतर टाय झाल्यामुळे प्रेक्षकांसाठी मेजवानीच ठरली. जयदीप दहीयाच्या 8 पकडींबरोबरच चढाईत 14 गुण मिळवणारा आमीर मोहम्मद जाफर दानिश हे दोघे सामन्याचे मुख्य आकर्षण ठरत असताना हा सामना 44-44 असा बरोबरीत सुटला.
एनएससीआय स्टेडियम झालेल्या या लढतीत हरियाणा स्टिलर्सने अतिशय वेगवान प्रारंभ करताना जयदीप दहियाच्या पकडीमुळे यु मुंबावर सातव्याच मिनिटाला पहिला लोन चढवून 11-6 अशी आघाडी घेतली. यावेळी पिछाडीवर असलेल्या यु मुंबा संघाला आमीर मोहम्मद जाफर दानिशच्या चढाया आणि सिध्दार्थ देसाईच्या सुपर रेडने सावरले व त्यांची पिछाडी मध्यंतराला केवळ तीन गुणांवर आली.
मध्यंतरानंतर मात्र, हरियाणा स्टिलर्सच्या खेळाडूंनी उत्कृष्ट चढाया आणि सुपर टॅकलच्या साहाय्याने आपली आघाडी 9 गुणांवर नेली. यु मुंबा संघाने सावध खेळ करताना टप्प्याटप्याने गडी बाद करत हरियाणा स्टिलर्सवर पहिला लोन चढवित 30-30 अशी बरोबरी साधली.
मात्र, पूर्वीप्रमाणेच हरियाणा स्टिलर्सने झटपट पुनरागमन करताना यु मुंबावर लोन चढवून पुन्हा 5 गुणांची आघाडी मिळवली. सामन्याचा निकाल स्पष्ट होत असतानाच यु मुंबा संघाने हरियाणा स्टिलर्सवर दुसरा लोन चढवून केवळ 40 सेकंद बाकी असताना 44-44 अशी बरोबरी साधली. उरलेल्या वेळात ही कोंडी फुटू शकली नाही. त्यामुळे ही लढत बरोबरीतच संपली.
No comments:
Post a Comment