४ नोव्हेंबरला ‘३६ गुण’ चित्रपटगृहात
घरदारं, कुटुंब, शिक्षण, नोकरी-व्यवसाय आणि सगळ्यात महत्त्वाचे लग्नपत्रिकेतले ‘३६ गुण’ जुळूनही लग्नं यशस्वी होतात का? या प्रश्नांची उत्तरं देणारा समित कक्कड यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला ‘३६ गुण’ हा आजच्या पिढीला जवळचा वाटेल असा मराठी चित्रपट येत्या शुक्रवारी ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री पूर्वा पवार यांची मुख्य भूमिका असलेल्या ’३६ गुण’ चित्रपटात पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकार सुद्धा दिसणार आहेत.
घरातल्यांच्या आशीर्वादाने, रीतसर पत्रिका बघून लग्न केलेल्या सुधीर आणि क्रियाला मधुचंद्रापासूनच एकमेकांच्या उणीवा जाणवू लागतात. यातूनच त्यांच्या नात्यात खटके उडू लागतात. नेमकं काय चूक? काय बरोबर? या व्दिधा मनःस्थितीत त्यांचं नातं कोणतं वळण घेतं? याची मनोरंजक तितकीच विचारप्रवृत्त करायला लावणारी गोष्ट म्हणजे '३६ गुण' चित्रपट.
रितीरिवाज, प्रथापरंपरा यापेक्षा ‘मनं’ आणि ‘मतं’ जुळणं किती महत्त्वाचं असतं हे ‘३६ गुण’ चित्रपटात अधोरेखित करण्यात आलं आहे. कुटुंबाचा, समाजाचा दबाव, जोडीदाराबद्दलच्या अवास्तव अपेक्षा आणि स्वत:चा अहंभाव अनेकदा हा या सगळयाच्या केंद्रस्थानी असतो. लग्न झालेल्या आणि न झालेल्या सगळयांना समोरं ठेवून ’३६ गुण’ या कथानकाची रचना करण्यात आली आहे. लग्न करणाऱ्या दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांना साथ देणे अतिशय गरजेचे आहे हे प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
‘मान मरताब, पगड़ी फेटे रेमंडवाला सूट रे ३६ गुण’ हे धमालबाजाचं आणि ‘दुरावा दलदल’ हे अतिशय भावस्पर्शी अशी दोन सुमधुर गाणी या चित्रपटात आहेत. हर्षवर्धन वावरे, जयदीप वैद्य, कीर्ती किल्लेदार यांचा स्वरसाज या गाण्यांना लाभला आहे. मंगेश कांगणे यांच्या गीतांना अजित परब यांचे संगीत लाभले आहे.
‘द प्रॉडक्शन हेडक्वार्टर्स लि’ व ‘समित कक्कड फिल्म्स निर्मित ‘३६ गुण’ चित्रपटाची निर्मिती मोहन नाडार, समित कक्कड, संतोष जुवेकर आणि सावित्री विनोद गायकवाड यांनी केली असून निखिल रायबोले, भूपेंद्रकुमार नंदन यांच्या कॅफे मराठीने या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा समित कक्कड आणि हृषिकेश कोळी यांची आहे. संवाद हृषिकेश कोळी यांचे आहेत. छायाचित्रण प्रसाद भेंडे तर संकलन आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले-सहाय यांचे आहे.
येत्या शुक्रवारी ‘३६ गुण’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
No comments:
Post a Comment