Monday, March 28, 2022

चित्रपटाचे धमाकेदार मोशन पोस्टर प्रदर्शित


लगन’... सारं काही प्रेमासाठी

 

प्रेम म्हणजे नाजूकअलवार अनुभूती. हळुवारनाजूकतेने प्रत्येकाच्याच आयुष्यात येणारे हे प्रेम प्रत्येकालाच हवे असते. प्रेमाचा प्रतीक असलेला गुलाब मात्र या प्रेमाचा खरा अर्थ सांगून जातो. जेवढे नाजूक फुल तेवढेच बोचरे काटे. अर्थात प्रेम करणे सोपे पण निभावणे अतिशय कठीण. प्रेमाची वाट बिकट असली तरी धरलेली साथ शेवटपर्यंत निभायाला लागणाऱ्या हिंमतीची गोष्ट घेऊन आलेल्या ‘लगन’ या मराठी चित्रपटाचे धमाकेदार मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

तुमचं ना.. रडू लय जवळ असतं.. अन् तेच आमचा जीव घेतं’..! अशी हळूवार टॅगलाईन असलेल्या या पोस्टर मध्ये उधळलेल्या घोडयावरून नववधूच्या वेशातल्या नायिकेला घेऊन जात असलेला जखमी नायक आपल्याला दिसतोय. सभोवतालचं वातावरण आणि त्याला असणारी आक्रमक पार्श्वसंगीताची जोड त्याला अजून प्रभावी बनवित आहे. जी. बी एंटरटेंन्मेंट निर्मित आणि अर्जुन गुजर दिग्दर्शित ‘लगन’ हा मराठी चित्रपट ६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अनेक संकटं जरी समोर आली तरी... प्रेम खरं असले की ती ओलांडण्याचे सामर्थ्यदेखील आपोआपच प्राप्त होतं. नायक आणि नायिकेच्या फुललेल्या एका प्रेमकथेची आणि स्वप्नांची हीच गोष्ट ‘लगन.. तुमाला वाटतंय पण सोपं नायी’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. ‘प्रेम निभावता आलं तर ते जिंकतं’ हे सांगण्याचा प्रयत्न ‘लगन’ या चित्रपटातून करण्यात आला आहे. सुजित चैारे आणि श्वेता काळे ही नवी जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अर्जुन गुजर यांनी केलं आहे. चित्रपटाचे छायांकन सोपान पुरंदरे आणि रणजीत माने यांचे आहे. संगीत पी.शंकरम, विजय गवंडे, रोहित नागभिडे यांचे असून अजय गोगावले, आदर्श शिंदे, चिन्मयी श्रीपाद, ओमकारस्वरूप बागडे, पी.शंकरम यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. पार्श्वसंगीत पी.शंकरम तर साऊंड डिझायन विकास खंदारे यांचे आहे.

No comments:

Post a Comment