‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षक पसंतीस
भव्य रंगमंच, दिलखेचक रोषणाई, मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणाला ढोल ताशांच्या गजराची साथ आणि त्यासोबत मराठेशाहीतील एकापेक्षा एक उत्तुंग व्यक्तिरेखांचा रंगमंचावरचा अविष्कार. हे सगळंच अगदी भारावून टाकणारं..!! निमित्त होतं ‘फत्तेशिकस्त’ या बहुचर्चित चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळ्याचं.
या सोहळ्याच्या निमित्ताने अवघी शिवशाही रंगमंचावर अवतरली होती. चित्रपटातील कलाकारांनी ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या वेशभूषेत स्वराज्य स्थापनेसाठीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा व त्यांना प्राणपणाने सोबत करणाऱ्या शिलेदारांचा संकल्पपट रसिकांना उलगडून दाखवला.
छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य’ निर्मितीसाठी ‘स्वराज्याचा शत्रू तो साऱ्यांचा शत्रू’ या न्यायाने लढले. ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या अशाच एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे. भारतातल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. ए.ए फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे. ‘फत्तेशिकस्त’ १५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शिवरायांच्या अष्टावधानी नेतृत्वाची, शौर्याची महती, त्यांच्या साथीदारांचा अजोड पराक्रम, शिस्तबद्ध आखणी या साऱ्यांचा अनुभव देणारा हा चित्रपट नव्या पिढीला खूप काही शिकवणारा असेल. शिवाजी महाराजांचा प्रत्येक गुण आत्मसात करण्याची संधी या चित्रपटाच्या निमित्ताने मिळाल्याची भावना कलाकारांनी याप्रसंगी व्यक्त केली.
मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे, अंकित मोहन, निखिल राऊत, हरीश दुधाडे, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, रुची सावर्ण, अश्विनी कुलकर्णी, नक्षत्रा मेढेकर, प्रसाद लिमये, अमोल हिंगे, ऋषी सक्सेना, सिद्धार्थ झाडबुके यासोबत हिंदीतला प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी यांसारख्या मातब्बर कलाकारांची भट्टी ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटात आहे.
छायांकन रेशमी सरकार तर संकलन प्रमोद कहार यांचे आहे. संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजी तर गीते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, वि.स खांडेकर, दिग्पाल लांजेकर यांची आहेत. वेशभूषा पौर्णिमा ओक यांची असून रंगभूषा सानिका गाडगीळ यांची आहे. ध्वनीलेखन निखील लांजेकर यांनी केले आहे. साहस दृश्ये बब्बू खन्ना तर नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. व्ही. एफ.एक्स इल्युजन ईथिरीअल स्टुडियोज यांचे आहे. कार्यकारी निर्माता उत्कर्ष जाधव आहेत. अजय आरेकर या चित्रपटाचे निर्माते आहेत.
'फत्तेशिकस्त' १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
No comments:
Post a Comment