आपल्याकडे लहान मुलांवर आधारित चित्रपट तसे फार कमीच पहायला मिळतात. लहानग्यांच्या भावविश्वात डोकावणारे दिग्दर्शक सचिंद्र शर्मा यांनी मात्र ही कमी भरून काढली. प्रचंड गाजलेल्या ‘माय फ्रेंड गणेशा’ या हिंदी चित्रपटाच्या चार सिरीजचे लेखक सचिंद्र शर्मा यांनी आतापर्यंत ‘मैं कृष्णा हूँ', ‘भूत अँड फ्रेंडस’, 'भूत अंकल' यांसारख्या अनेक लोकप्रिय बालचित्रपटांच्या संवादलेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळलेली असून त्यांच्या बालचित्रपटांची जादू आता मराठीत ही पहायला मिळणार आहे. नुकताच त्यांचा 'बाळा' हा कौटुंबिक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यश अँड राज एंटरटेनमेंट प्रस्तुत राकेश सिंह निर्मित 'बाळा' चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक सचिंद्र शर्मा यांच्याशी केलेली ही खास बातचीत..
'बाळा' ही गोष्ट आहे अशा एका लहानग्याची ज्याला क्रिकेटचे प्रचंड वेड आहे. क्रिकेटमध्ये चॅम्पिअन असणाऱ्या या 'बाळा'ला खेळात आपलं करिअर घडवायचं आहे पण वडिलांना मात्र आपल्या मुलाने सुप्रिडेंन्ट ऑफ पोलीस व्हावं असं मनापासून वाटतं. वडील आणि मुलातला हा संघर्ष कधी-कधी किती घातक ठरू शकतो ह्यावर 'बाळा' हा चित्रपट भाष्य करतो. प्रत्येकात एखादं कौशल्य/गुण दडलेला असतो, पालकांनी जाणून घेत त्याला फक्त पॉलिश करायचं हा मार्मिक सल्ला हलक्या-फुलक्या पद्धतीने 'बाळा' चित्रपटातून आम्ही पालकांना देऊ इच्छित आहोत.
मराठीमध्ये तुम्ही पहिल्यांदाच चित्रपट करत आहेत त्याबद्दल थोडेसे सांगा?
आशयपूर्ण मराठी चित्रपटांचा मी चाहता आहे. कथाविषयांमधलं नावीन्य आणि मराठी कलावंतांचा अभिनय मला नेहमीच आकर्षित करत आला आहे. भोजपुरी चित्रपटांचे निर्माते राकेश सिंह यांच्यासोबत मला एक चित्रपट बनवण्याची संधी लाभली. भोजपुरी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याचा आम्हाला अनुभव गाठीशी होता आत्ता आम्हाला काहीतरी हटके करायचं होतं. मराठी प्रेक्षक नेहमीच चांगल्या कलाकृतींना उत्तम प्रतिसाद देतात म्हणूनच आम्ही 'बाळा' मराठीत चित्रित करण्याचा निर्णय घेतला.
'बाळा' मधील कलाकारांची निवड कशी केली गेली आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता?
'बाळा' मध्ये तीन पिढ्यांचा संघर्ष आहे. आजोबा-मुलगा-नातू ही तिन्ही कॅरेक्टरस मध्यवर्ती आहेत त्यासाठी कलाकारसुद्धा त्याच ताकदीचे लागणार होते. अनुक्रमे विक्रम गोखले, उपेंद्र लिमये आणि मिहिरेश जोशी यांना घेण्याचं ठरवलं आणि त्यांनी ह्या व्यक्तिरेखा अगदी उत्तम वठवल्या. मुलं वडिलांपुढे जे बोलू शकत नाही ते आई जवळ सहज बोलतात. 'बाळा' मध्ये आईची भूमिका एकदम स्ट्रॉंग आहे म्हणूनच आम्ही उपेंद्र लिमयेंच्या आईच्या भूमिकेसाठी सुहासिनी मुळ्ये आणि बाळाच्या आईच्या भूमिकेसाठी क्रांती रेडकर यांना निवडलं. या शिवाय कमलेश सावंत सुद्धा 'बाळा' मध्ये नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत दिसतील. या कलाकारांसोबत काम करताना खूप मजा आली. या साऱ्यांसोबत काम करण्याचा अनुभव मला खूप समृद्ध करणारा होता.
चित्रपटाचं नाव 'बाळा' ठेवण्यामागील उद्देश ?
ही गोष्ट एका कुणाची नसून प्रत्येक लहानग्याची आहे ज्याचे पंख भरारी घ्यायला सज्ज होण्याआधीच छाटले जातात तसं होऊ नये. मराठीमध्ये लहान मुलांना प्रेमाने 'बाळा' म्हणून संबोधलं जातं. प्रत्येक 'बाळा'ला त्याला जे हवंय ते करण्याची संधी मिळायलाच पाहिजे हीच बाब ‘बाळा’ चित्रपटातून अधोरेखित केली गेलीये आणि म्हणूनच आम्ही आमच्या चित्रपटाचं नाव 'बाळा' ठेवलं.
No comments:
Post a Comment