यशस्वी मॅाडेल ते धडाकेबाज अभिनेता असा यशस्वीपणे प्रवास करत स्वत:चा मोठा चाहतावर्ग निर्माण करणाऱ्या जॅान अब्राहमलाही आता मराठीचे वेध लागले आहेत. मराठी कलाकार-तंत्रज्ञां इतकंच मराठी सिनेमांवरही प्रेम करणाऱ्या जॅानने आता स्वत:च मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे. ८० च्या दशकात मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकावर आधारित असलेल्या सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी जॅानने स्वीकारली आहे.
शेखर ताम्हाणे दिग्दर्शित ‘सविता दामोदर परांजपे’ हे नाटक १९८५ मध्ये रंगभूमीवर आलं होतं. राजन ताम्हाणे आणि रीमा लागू यांची प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. अभिनय, दिग्दर्शन, सादरीकरण, पार्श्वसंगीत आणि अप्रतिम संहिता असलेलं मनाचा थरकाप उडवणारं हे नाटक त्या काळातील रसिकांनी डोक्यावर घेतलं होतं. आजच्या पिढीला हा अनुभव घेता यावा याकरीता ‘सविता दामोदर परांजपे’ हे नाटक सिनेमाच्या रूपात समोर येत आहे.
जे. ए. एन्टरटेन्मेंट आणि पॅनोरमा स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाची निर्मिती जॅान अब्राहम करत आहे. स्वप्ना वाघमारे जोशी या सिनेमाच्या दिग्दर्शिका आहेत. मराठी प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सुबोध भावे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्या जोडीला तृप्ती तोरडमल आणि राकेश बापट हे कलाकार आहेत. शिरीष लाटकर यांनी या सिनेमाचं लेखन केलं असून निलेश मोहरीर आणि अमित राज यांचं सुश्राव्य संगीत चित्रपटाला लाभले आहे.
येत्या ३१ ऑगस्ट ला ‘सविता दामोदर परांजपे’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
No comments:
Post a Comment