Tuesday, March 20, 2018

दत्ता पाटील व अविनाश गोडबोले ‘चैत्र चाहूल’ पुरस्काराने सन्मानित

वास्तववादी व्यक्तींच्या कर्तृत्वाची जाणीव करुन देणारा पुरस्कार
-    किरण नगरकर


मुंबई, प्रतिनिधी - चैत्र चाहूलच्या वतीने विविध क्षेत्रातील व्यक्तिंना देण्यात येणारे ध्यास सन्मान व रंगकर्मी सन्मान म्हणजे वास्तववादी व्यक्तीच्या कर्तृत्वाची जाणीव करुन देणारे पुरस्कार असल्याचे, उद्गार ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर यांनी काढले.
मराठी नववर्षाचे औचित्य साधत नेहमीप्रमाणे यंदा हा चैत्र चाहूल सोहळा आज रविंद्र नाट्यगृहात दिमाखदारपणे पार पडला. याप्रसंगी लेखक दिग्दर्शक दत्ता पाटील यांना रंगकर्मी पुरस्कार तर ज्येष्ठ कला दिग्दर्शक अविनाश गोडबोले यांना ध्यास सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ऋषी परांजपे दिग्दर्शित सॉरी परांजपे ही गाजलेली लोकांकिका सादर करण्यात आली.
उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना त्यांच्या विशेष कामगिरीसाठी दाद म्हणून ध्यास सन्मान व रंगकर्मी सन्मानाने गेले १३ वर्षे सन्मानित केले जाते. यंदा या सोहळ्यात लेखक दिग्दर्शक दत्ता पाटील यांना रंगकर्मी पुरस्कार तर ज्येष्ठ कला दिग्दर्शक अविनाश गोडबोले यांना ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रुपये २५ हजार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच खासदार विनय सहस्रबुध्दे यांची भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आय.सी.सी.आर) च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक अंबरीश मिश्र यांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले. संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनाही सन्मानित करण्यात आले. श्री. जोशी यांच्या अनुपस्थितीत सौ. जोशी यांनी सन्मान स्वीकारला.
दत्ता पाटील यांच्या ‘सेलीब्रेशन’ ह्या पहिल्याच एकांकिकेला प्रतिष्ठेचा पुरुषोत्तम करंडक पुरस्कार त्यानंतर कृष्णविवर, मध्यमपदलोपी या सारख्या दीर्घांकाला तसेच ब्लॅक आऊट, सयामी, सिटीलाईल या एकांकिकांना प्रतिष्ठित पुरस्कार त्याचप्रमाणे नुकतेच गाजलेले नाटक ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकास मुंबई व्यावसायिक नाट्यनिर्मात्यासंघाच्या दीर्घांक स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळालेले आहे.
तसेच जे. जे. स्कूल ऑफ आर्टस, मुंबई येथून पदवी संपादन केल्यानंतर देशभरातील मोठमोठ्या प्रतिष्ठीत संस्थांमधून क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून काम करणारे व कमर्शियल आर्टिस्ट म्हणून गिल्ड (कॅग) या संस्थेने ‘हॉल ऑफ फेम’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केलेले ज्येष्ठ कला दिग्दर्शक अविनाश गोडबोले यांनाही सन्मानित करण्यात आले.
अविनाश गोडबोले यांनी जरी जाहिरात क्षेत्राला मोठे योगदान दिले असले तरी त्यांचा मूळचा ओढा चित्रकलेकडे अधिक होता. त्यांना पक्षाघाताचा झटका आल्यांनतरही त्यांनी आपल्या आजारपणातील प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन त्यांनी डाव्या हाताने आपला चित्रकलेचा छंद जोपासून लोकांपुढे इच्छा तिथे मार्ग हा आदर्श ठेवला आहे, असे प्रशंसोद्गार नगरकर यांनी काढले.
या सोहळ्याची सांगता रुद्र एंटरप्रायजेसच्या वतीने आयोजित शास्त्रीय गायकांनी गायलेल्या गीतांवर आधारित ‘स्वरधारा’ या कार्यक्रमाने झाली. यावेळी महेंद्र पवार, निमंत्रक संजीव सावंत व विनायक गवांदे, कॉक्स ॲण्ड किंग्जचे आशुतोश मेहरे, दिलीप करंबळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सोहळ्याचे सूत्रसंचालन चैत्र चाहूलचे विनोद पवार यांनी केले.

No comments:

Post a Comment