मराठी चित्रपटसृष्टीत सध्या खूप वेगळे आणि चांगले विषय हाताळले जातायेत. जास्त लोकांपर्यंत सहजपणे पोहोचायचं असेल तर आजच्या काळात सोशल मीडियासारखं दुसरं प्रभावी माध्यम नाही. या माध्यमाचा वेध घेत त्याच्याशी संबधित कथेवर आधारलेल्या‘ईमेल फिमेल’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, सुप्रसिद्ध नदीम-श्रवण या संगीतकार जोडीतील श्रवणजी व त्यांचे सुपुत्र संगीतकार दर्शन हे या प्रसंगी उपस्थित होते. एस.एम बालाजी फिल्म प्रोडक्शन यांची प्रस्तुती असणाऱ्या ‘ईमेल फिमेल’ या चित्रपटाची निर्मिती शैलेश कोते आणि मनीष पटेल यांनी केली असून कथा आणि दिग्दर्शन योगेश जाधव यांचे आहे.
चित्रपटाला मनापासून शुभेच्छा देत एक चांगली टीम या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आली असल्याचे अभिनेते विक्रम गोखले यांनी याप्रसंगी सांगितले. ‘ईमेल फिमेल’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठीत काम करणार असून वेगळं संगीत देण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझा असेल, असं सांगत संगीतकार श्रवणजी यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.
आजची पिढी एकमेकांशी ‘कनेक्ट’ राहण्यासाठी इमेल, फेसबुक सारख्या समाज माध्यमांचा वापर करते. अनेक गोष्टींची माहिती या माध्यमांद्वारे पुरवली जाते. अशाच माहितीतून घडणारे कथानक ‘ईमेल फिमेल’ या चित्रपटातून उलगडलं जाणार आहे. विक्रम गोखले,निखिल रत्नपारखी, दिप्ती भागवत, कांचन पगारे, प्राजक्ता शिंदे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव व बालकलाकार मैथिली पटवर्धन या कलाकारांच्या यात भूमिका आहेत.
चित्रपटाची पटकथा भक्ती जाधव यांची आहे. संवाद भक्ती आणि योगेश जाधव यांनी लिहिले आहेत. श्रवणजी आणि अभिजीत नार्वेकर यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली आहे. छायांकन मयुरेश जोशी तर कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे. वेशभूषा सुहास गवते आणि देवयानी काळे यांची आहे. कार्यकारी निर्माते स्वप्नील वेंगुर्लेकर आहेत. लवकरच ‘ईमेल फिमेल’ च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.
No comments:
Post a Comment