सारा क्रिएशन व मिनीम फाऊंडेशनची प्रस्तुती असलेल्या आरती द अननोन लव्हस्टोरी या मराठी चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांच्या हस्ते ध्वनीफितीचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी संगीतकार अमित राज, पंकज पडघन तसेच समाजसेविका गौरी सावंत आवर्जून उपस्थित होते. मानवी मूल्यं जपणारी ही प्रेमकथा रुपेरी पडद्यावर यावी यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. या चित्रपटाची निर्मिती, लेखन व दिग्दर्शन सारिका मेणे यांनी केलं आहे. आरती चित्रपटातील गीते प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतील असा विश्वास व्यक्त करताना या चित्रपटाला गायक आनंद शिंदे यांनी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
आरती चित्रपटातून प्रेमाच्या बंधाचे अनोखे पैलू उलगडणार आहेत. रोशन विचारे आणि अंकिता भोईर यांनी यात मुख्य भूमिका साकारली असून यांच्यासोबत सपना कारंडे, उमेश दामले, सुजित यादव तेजस बने, मेघाली जुवेकर, प्रांजली वर्मा, कांचन पगारे तसेच बालकलाकार सारा मेणे व अनुष्का पाटील आदिंच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे सहनिर्माते शेफाली साथी व बानुमती सुजित आहेत. संवाद प्रभाकर भोसले यांचे आहेत. छायांकन व संकलन जोतीरंजन दास याचं आहे. कलादिग्दर्शक महेश मेणे आहेत. कार्यकारी निर्माते सिद्धेश शेट्ये आहेत.
या चित्रपटात वेगवेळ्या जॉनरची सहा गीते आहेत. सुजित यादव व तेजस बने यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीतांना प्रशांत सातोसे व सुजित – तेजस यांनी संगीत दिलं आहे. यातील ‘पार्वतीच्या नंदना मोरया गजानना’ आणि ‘पावसाळी मनी माझ्या पेटला काहूर का’ या गीताला गायक आदर्श शिंदे यांचा तर ‘मन बावरे’ गीताला हरिहरन व दिपाली साठे यांचा स्वरसाज लाभला आहे. ‘नन्ही सी परी’ ही अंगाईगीत व ‘विठ्ठला’ हे भक्तीमय गीत प्रशांत सातोसे यांनी गायलं आहे. सुजित यादव यांनी ‘आम्ही जातो’ हे गीत गायलं आहे.
नात्याची समीकरणे बदलत चालली असताना प्रेम आणि विश्वास यापलीकडच्या माणुसकीच्या नात्यावर भाष्य करणारा आरती चित्रपट प्रत्येकाला आयुष्याचा आनंदसोहळा कशा करायचा हे शिकवेल. येत्या १८ ऑगस्टला आरती हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
No comments:
Post a Comment