Thursday, March 9, 2017

‘मला लगीन करायचं’ म्युझिक अल्बम प्रकाशित



काही दिवसांपासून मानसी नाईक लग्न करतेय का? मानसी नाईक लग्नाच्या बेडीत अडकतेय का? मानसी कोणाशी लग्न करतेय? अशी कुजबूज मनोरंजन क्षेत्रात सुरु होती. मानसीच्या लगीनघाईचा खुलासा नुकताच उलगडला तो ‘मला लगीन करायचं’ या म्युझिक अल्बमच्या प्रकाशन सोहळ्यात. नानूभाई जयसिंघानी यांच्या ‘व्हिडिओ पॅलेस’ प्रस्तुत ‘मला लगीन करायचं’ या धमाकेदार म्युझिक अल्बमच्या निमित्ताने रंगलेला  मानसीच्या लग्नाचा अनोखा प्रमोशन फंडा सुपरहिट ठरला असून हे गाणं प्रदर्शनापूर्वीच खूप लोकप्रिय ठरलंय. या म्युझिक अल्बमच्या प्रकाशनासाठी त्यांची संपूर्ण टीम लग्नाच्या थाटामाटात अवतरली होती.

या अल्बमचे वैशिष्ट्य म्हणजे यात ‘डान्सिंग क्वीन’ मानसी नाईक सोबत ‘कॉमेडी बादशहा’ जॉनी लिवर आणि ‘डीआयडी’ फेम सिद्धेश पै या तिघांनी प्रथमच एकत्र ताल धरला आहे. शिवाय जॉनी लिवर यांनी प्रथमच मराठी रॅप स्टाईलमध्ये ‘मला लगीन करायचं’ या गीताचा मुखडा गायला आहे. तिघांच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीमुळे हा अल्बम खूपच देखणा झालाय. मराठी आणि पाश्चिमात्य संगीताच्या फ्युजनमध्ये काहीतरी नवीन करायचं या विचारातून या गीताची निर्मिती झाली आहे. ‘व्हिडिओ पॅलेस’ प्रस्तुत ‘मला लगीन करायचं’ या अल्बमची निर्मिती, दिग्दर्शन व कोरिओग्राफी अशी तिहेरी जबाबदारी सिद्धेश पै यांनी सांभाळली आहे. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मानसी नाईकने या गीतात जॉनी, सिद्धेश व १२ डान्सर मुलींसोबत रॉकिंग परफॉर्मन्स दिला आहेच; शिवाय या गीतातील प्रत्येकाचे लूक आणि स्टाईल डिझाईन केले आहेत.

रोशनी भालवणकर आणि मानवेल गायकवाड लिखित या गीताला संगीतकार स्वरूप भालवणकर यांनी संगीत दिलं असून स्वरूप भालवणकर सोबत आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजात ते स्वरबद्ध झालं आहे. या अल्बमचे छायाचित्रण किरण गुंजाळ यांनी केलं असून वेशभूषा दिपेश हिंगु यांची तर कलादिग्दर्शन प्रणय व प्रितेश यांनी केलंय. कॉमेडी किंग जॉनी लिव्हर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल खूप आनंद झाल्याची भावना मानसी नाईकने या निमित्ताने व्यक्त केली. जॉनी लिवर यांनी देखील काम करताना खूप धमाल अनुभव आल्याचे सांगितले. सिद्धेश पै याने देखील ‘व्हिडिओ पॅलेस’ने इतक्या दिमाखदार स्वरुपात हा अल्बम प्रदर्शित केल्याबद्दल नानूभाई जयसिंघानी यांचे आभार मानले.

येत्या लग्नसराईत ‘मला लगीन करायचं’ हे गीत नक्कीच धुमाकूळ घालेल.

No comments:

Post a Comment