Thursday, July 7, 2016

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भारतातील पहिल्या ‘ई-हेल्थ कार्ड’चे अनावरण



प्रत्येकाच्या आरोग्याची इत्यंभूत माहिती एकाच ठिकाणी नोंद करणारे भारतातील पहिले ‘ई-हेल्थ कार्ड’ बनविण्याचा बहुमान पुण्यातील ‘एनकॉर्ड हेल्थ कार्ड एलएलपी’ या स्टार्टअप कंपनीने पटकाविला आहे. एखाद्या व्यक्तीला त्याचा वैद्यकीय तपशील कोठेही सोबत नेण्याची सुविधा या कार्डमुळे प्राप्त झाली असून डॉक्टरांना या कार्डच्या आधारे आपत्कालीन स्थितीमध्ये वेळेवर उत्तम वैद्यकीय सेवा देता येणे शक्य होणार आहे. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या ‘ई-हेल्थ कार्ड’चे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी करण्यात आले. यावेळी ‘एनकॉर्ड’चे व्यवस्थापकीय अधिकारी श्री. प्रकाश लोहारकर व ‘ई-हेल्थ कार्ड’चे विभाग प्रमुख श्री. वीरू स्वामी उपस्थित होते.   

मानवी सेवा उद्योगाला फायदा मिळवून देण्याच्या हेतूने नवी दिशा देत अभिनव तंत्रज्ञानाचा वापर करीत भारतात पहिले ‘ई-हेल्थ कार्ड’ तयार केले आहे. जगात सगळीकडेच ग्लोबल क्रांती घडत असताना आरोग्य विभाग याला अपवाद कसा ठरेल. ‘एनकॉर्ड ई-हेल्थ कार्ड’मुळे भविष्यात आरोग्य विषयक सुविधांमध्ये निश्चितच आशादायी चित्र पहायला मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पहिले ई-हेल्थ कार्ड प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ई-हेल्थ कार्ड’ विषयी जागरूकता वाढविण्यासाठी आरोग्य विभागाला प्रोत्साहित करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. चार वर्षांच्या अथक प्रयत्नांतून, चोखंदळ परीक्षण व ध्येयात्मक मांडणीने हे ई-हेल्थ कार्ड तयार केले असून ते वितरणासाठी सज्ज झाले आहे. या ई-हेल्थ कार्डमुळे सर्वसामान्य, वैद्यकीय व्यावसायिक तसेच आरोग्य सुरक्षा व्यावसायिकांना निश्चितच फायदा होईल, असे प्रतिपादन ‘एनकॉर्ड’चे मुख्य मार्गदर्शक डॉ. दिपक शिकारपूर व ‘एनकॉर्ड’चे सहाय्यक पार्टनर निलेश कांदळगावंकर यांनी केले आहे.

‘एनकॉर्ड हेल्थ कार्ड’ विषयी अधिक माहितीसाठी संकेतस्थळ  : www.ehealthcardindia.com

No comments:

Post a Comment