उद्योग क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान
उद्योग क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महाराष्ट्रातील उद्योजकांचा सन्मान मॅक्सेल फाउंडेशनतर्फे केला जातो. यंदाचा पाचवा मॅक्सेल सन्मान सोहळा नुकताच वरळीतील नेहरू सेंटरच्या सभागृहात संपन्न झाला. बजाज समुहाचे अध्यक्ष श्री. राहुल बजाज यांच्या हस्ते निवड झालेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सामजिक मूल्ये जपणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन राहुल बजाज यांनी यावेळी केले.
यावेळी ‘मॅक्सेल लाइफटाइम अचिव्हमेन्ट अॅवार्ड्’ या जीवनगौरव पुरस्काराने महाराष्ट्र हायब्रीड सीडसचे अध्यक्ष डॉ बी.आर. बारवाले यांना सन्मानित करण्यात आले. बी वी जी ग्रुपच्या एच. आर गायकवाड यांना ‘मॅक्सेल अॅवार्ड्स फॉर एक्सलन्स इन आन्त्रप्रेन्युअरशिप’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘मॅक्सेल अॅवार्ड्स फॉर एक्सलन्स इन बिझनेस लीडरशिप’ या पुरस्कारासाठी एअरबस इंडियाचे उपाध्यक्ष आशिष सराफ यांना सन्मानित करण्यात आले. श्रीकृष्णा आणि अलका करकरे यांना ‘मॅक्सेल अॅवार्ड्स फॉर एक्सलन्स इन इनोव्हेशन’ हा पुरस्कार देण्यात आला. ‘मॅक्सेल अॅवार्ड्स फॉर एक्सलन्स इन स्पेशल रेकगनेशन’ पुरस्कार मराठवाडा ऑटो क्लस्टर या औरंगाबादच्या कंपनीला व सिंबोयसिस च्या मुख्य संचालिका डॉ. स्वाती मुजुमदार यांना देण्यात आला. ‘मॅक्सेल अॅवार्ड्स फॉर एक्सलन्स इन स्टाटर्प अॅवार्ड्’ पुरस्काराने बिग बिझनेस अॅवायझर्स चे उपाध्यक्ष मकरंद पाटील व मोबोन्ड कन्सलटन्सीचे संचालक सचिन टेके यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित भुरे तर प्रास्ताविक मॅक्सेल फाउंडेशनचे संस्थापक नितीन पोतदार यांनी केले. शालेय स्तरावर उद्योजकता हा अभ्यासक्रम आवश्यक असल्याचे सांगत यासाठी ‘मॅक्सप्लोअर’ हे आवश्यक व माहितीपर पुस्तक यावेळी मॅक्सेल फाउंडेशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले. या सोहळ्याला डॉ. रघुनाथ माशेलकर, कुमार केतकर, सीए शैलेश हरिभक्ती, केसरीभाऊ पाटील, विनायक कुलकर्णी, अतुल राजोळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment