‘गारवा’, ‘सांजगारवा’, ‘ये है प्रेम’, ‘रसिया’ यांसारख्या अनेक हिंदी-मराठी अल्बम्समुळे मिलिंद इंगळे आजही संगीतप्रेमींच्या मनात घर करून आहेत. मुलायम आवाजाची देणगी लाभलेल्या अशा या गायकाने काही दिवसांपूर्वी ‘मुखातिब’ हा हिंदी-उर्दू गझलांचा नजराणा लोकांपुढे सादर केला. इनरव्हॉइस प्रॉडक्शन्स प्रा. लि. या स्वतःच्या कंपनीतर्फे सादर केलेल्या दीनानाथ मंगेशकर आणि प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथील यशस्वी कार्यक्रमांनंतर मिलिंद इंगळे हाच कार्यक्रम आता खास ठाण्यातील संगीतप्रेमींसाठी प्रथमच गडकरी रंगायतन येथे शुक्रवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी रात्रौ ८:४५ वाजता घेऊन येत आहेत.
‘मुखातिब’ या कार्यक्रमात जगजीत सिंग, पंकज उधास, अनुप जलोटा यांसारख्या दिग्गज गायकांच्या प्रसिद्ध गझलांचे सादरीकरण मिलिंद आपल्या खास शैलीत करणार आहेत. या मैफिलीचं दुसरं आकर्षण म्हणजे जगजीत सिंग यांच्याबरोबर वर्षानुवर्षे गिटारवर साथ करणारे चिंटू सिंग या कार्यक्रमात मिलिंद यांना साथ करणार आहेत. याशिवाय मानस कुमार (व्हायोलीन), अभिषेक मेस्त्री (कीबोर्ड) आणि समीर शिवगार (तबला) हे कलाकार मिलिंद यांना सहवादक म्हणून लाभले आहेत.
‘मुखातिब’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्दू भाषेचे गाढे अभ्यासक सुहैल अख्तर वारसी करणार आहेत. पं. यशवंतबुवा जोशी, के. महावीरजी आणि राजकुमार रिझवी यांसारख्या दिग्गज गुरूंकडून शास्त्रीय संगीत व गझल गायनाचे शिक्षण घेतलेल्या मिलिंद यांचा ‘मुखातिब’ हा कार्यक्रम ठाण्यातील गझलप्रेमींकरिता पर्वणीच ठरणार आहे.
No comments:
Post a Comment