Thursday, July 23, 2015

स्मिताची फक्कड लावणी
मराठी चित्रपट आणि लावणी हे समीकरण अगदी जुने आहे.प्रीतपाल सिंग शेरगील निर्मित व वाईल्ड रोझ फिल्मची प्रस्तुती असलेल्या 'जीत' या आगामी मराठी चित्रपटातही एक फक्कड लावणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्या अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांवर छाप पाडणाऱ्या स्मिता  तांबे  या अभिनेत्रीवर ही बहारदार लावणी नुकतीच चित्रीत करण्यात आली.

उत्तम संगीत आणि नखरेल अदाकारीने सजलेली लावणी रसिकांना घायाळ केल्याशिवाय राहत नाही. ‘जीत’ या चित्रपटातील ‘शृंगाराच्या शेकोटीचा उजेड पडला नवा, राया माझ्या काळजात पेटला लाल दिवा’ या संजय पाटील लिखित गीतावर स्मिता यांनी आपल्या मोहक अदाकारीने झक्कास रंग भरले आहेत. वैशाली सामंत यांच्या स्वरातील या लावणीला अमितराज यांनी ठेका धरायला लावणारं संगीत दिलं आहे. या बहारदार लावणीचं नॄत्यदिग्दर्शन सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक चिन्नी प्रकाश व रेखा प्रकाश यांनी केले आहे.
     
‘जीत’ या चित्रपटातील कथेच्या अतिशय महत्त्वाच्या वळणावर येणारी ही लावणी प्रेक्षकांना नक्कीच ताल धरायला लावेल अशी आशा चित्रपटाचे दिग्दर्शक सागर चव्हाण व्यक्त करतात. या लावणी बाबत आपण खूपच एक्साइट असल्याचे स्मिता तांबे यांनी सांगितले.

पैसा आणि सत्तेच्या बळावर आपण काहीही करू शकतो ही अलीकडच्या काळातील मानसिकता नष्ट करण्याचा प्रयत्न'जीत' या वेगळ्या आशयाच्या चित्रपटात करण्यात आला आहे. मंजुश्री गोखले यांनी या चित्रपटाची कथा लिहीली असून पटकथा मंजुश्री आणि सागर चव्हाण यांनी लिहीली आहे. भूषण प्रधान,सचिन दनाई, सयाजी शिंदे, त्रिशला शहा, शरद पोंक्षे, मनोज जोशी, विलास उजवणे, अंजली उजवणे, वरुण गुलाटी यांच्या अभिनयाने सजलेला 'जीत' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

1 comment: