मुंबई (प्रतिनिधी) : मराठी चित्रपटसृष्टीतीमध्ये सध्या क्वचितच एखादा ऍक्शनपट रिलीज होतो मात्र ऍक्शनपटांना मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक पसंत करतात. प्रेक्षकांची ही पसंती लक्षात घेत विजय फिल्म अँड प्रोडक्शनने आपल्या आगामी ‘माझे नशीब’ या चित्रपटाची घोषणा करत मुहुर्त साजरा केला. मालाड येथील नंदनवन शुटींग पॉईंट येथे संपूर्ण चित्रपट कलावंत तसेच तंत्रज्ञानाच्या उपस्थितीत हा मुहुर्त पार पडला. याप्रसंगी लेखक दिग्दर्शक हर्षद रायपुरे, निर्माते विजय पाटील,कार्यकारी निर्माता जयराम नाडर (जय) चित्रपटातील प्रमुख अभिनेता अनिरुद्ध (अब तक छप्पन फेम), अभिनेत्री दिप्ती धोत्रे, झोया शेख, मिलिंद शिंदे मोहित पाटील आदी प्रमुख कलावंत उपस्थित होते. ‘माझे नशीब’ या चित्रपटाविषयी बोलतांना लेखक दिग्दर्शक हर्षद रायपूरे म्हणाले की, मराठी चित्रपटसृष्टीत ऍक्शनपट खुप कमी प्रमाणात येतात. मात्र प्रेक्षकांची ऍक्शनपटाला मोठी पसंती आहे. म्हणूनच आम्ही ‘माझे नशीब’ हा ऍक्शनपट प्रेक्षकांसाठी सादर करीत आहोत. तर चित्रपट निर्माते विजय पाटील यांनी या चित्रपटाविषयी बोलतांना सांगितले की, चित्रपट निर्मिती करायची ही माझी फार पूर्वीपासूनची इच्छा होती, ती आता ‘माझे नशीब’च्या निमित्ताने पूर्ण होत आहे. तर चित्रपटातील प्रमुख भुमिका करत असलेला अनिरुद्ध याने या चित्रपटातील भुमिकेला मी योग्य न्याय देणार असल्याचे सांगितले. अनिरुद्ध याचा नुकताच ‘अब तक छप्पन’ चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटातील संगीत महेंद्र खेरडकर यांचे असून कुनाल गांजावाला, नेहा राजपाल, वैशाली सामंत, जगदीश पाटील, आनंद शिंदे हे सुप्रसिद्ध गायक आपल्या आवाजाच जादूने मंत्रमुग्ध करणार आहेत. ‘माझे नशीब’मध्ये प्रथमच मॉडर्न लावणी, ठसकेबाज कव्वाली, रोमॅन्टीक तसेच युवकांसाठीचे अशी चार गीत आहेत. चित्रपटाची कला दिग्दर्शक मयुर निकम, प्रोडक्शन मॅनेजर शमीत ठाकूर हे आहेत. कच्छ, मुंबई, महाबळेश्वर येथे या चित्रपटांचे चित्रीकरण होणार असून लवकरच ‘माझे नशीब’ हा ऍक्शन थ्रीलर मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
No comments:
Post a Comment