Monday, January 26, 2015

'एक तारा' मध्ये वाजणार 'रेगे'तील 'शिट्टी' मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात प्रथमच दोन सिनेमांमध्ये एक गीतकॉपी राईट आणि त्यावर झालेले अनेक वाद आजवर आपण नेहमीच पाहात आलो आहोत. कोणत्याही वादाला तोंड फुटू नये याची दक्षता घेत कोणतीही गीतरचना किंवा कथानक निवडताना निर्माता-दिग्दर्शकाकडून विशेष काळजी घेतली जाते. यामुळेच आजवर दोन सिनेमांमध्ये एकच गीत कधीच वाजले नाही. 'एक तारा' हा आगामी मराठी सिनेमा मात्र याला अपवाद ठरला असून सिनेसृष्टीतील दोन जीवलग मित्रांच्या पुढाकारामुळे हे शक्य झाले आहे. अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'रेगे' सिनेमातील 'शिट्टी वाजली…' हे गीत आता 'एक तारा' या सिनेमातही धम्माल करणार आहे. 

दोन सिनेमात एक गीत हा प्रयोग यापूर्वी कधीच झाला नव्हता. रईस लष्करीया प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या 'एक तारा' सिनेमात तो प्रथमच करण्यात आला आहे. 'एक तारा'चे दिग्दर्शक असलेले गायक- संगीतकार-निर्माते अवधूत गुप्ते आणि दिग्दर्शकाच्या रुपात 'रेगे'सारखा सिनेमा देणारे अभिजित पानसे यांची मैत्री जगजाहीर आहे. याच मैत्रीचे प्रतिबिंब 'रेगे' पाठोपाठ 'एक तारा'मध्ये उमटले आहे. अभिजीत पानसेंच्या लेखणीतून आकाराला आलेले 'शिट्टी वाजली…' हे गीत 'एक तारा'मध्येही असेल असे अभिजीत आणि अवधूत गुप्ते यांनी 'रेगे' तयार होत असतानाच ठरवले होते. त्यामुळेच 'एक तारा'मधेही 'रेगे'तील शिट्टी वाजणार आहे. हे गीत अवधूत गुप्ते आणि आनंद शिंदे यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे. 

दिग्दर्शनासोबतच सिनेमाची कथाही अवधूत गुप्ते यांनी सचिन दरेकर यांच्या सहकार्याने लिहिली आहे. पटकथा-संवाद सचिन दरेकर यांचे आहेत . सादिक  लष्करिया आणि विशाल घाग या सिनेमाचे सहनिर्माते असून विशाल देवरुखकर सहदिग्दर्शक आहेत. मराठीतील नामांकित कॅमेरामन अमलेंदू चौधरी यांच्या नजरेतून हा सिनेमा कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. संतोष जुवेकरची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात तेजस्विनी पंडित, उर्मिला निंबाळकर, सागर कारंडे, सुनील तावडे, मंगेश देसाई, आणि चैतन्य चंद्रात्रे यांच्या भूमिका आहेत. कलादिग्दर्शनाची बाजू शैलेश महाडीक यांनी सांभाळली असून संकलनाचे काम इम्रान महाडीक आणि फैझल  महाडीक यांनी पाहिले आहे. अश्विनी कोचरेकर यांची वेशभूषा लाभलेल्या या सिनेमाचे कथानक एका गायकाभोवती गुंफण्यात आले आहे. स्वतःला सिद्ध करण्याचा त्याचा प्रवास आणि सिद्ध केल्यावर  स्टारडम टिकवून ठेवण्याची त्याची कसरत या सिनेमात अवधूत गुप्ते यांनी अतिशय सुरेखरीत्या पडद्यावर रेखाटली आहे. 

सिनेमाच्या घोषणेपासून प्रदर्शनापर्यंत कायम विविध कारणांमुळे चर्चेत राहिलेला 'एक तारा' ३० जानेवारीपासून रसिकांच्या भेटीला येत आहे.  

No comments:

Post a Comment