Tuesday, October 14, 2014

अरुणा इराणी यांचे मराठीत पुनरागमन



आपल्या हरहुन्नरी अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान पटकावणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे अरुणा इराणी. नायिका, खलनायिका, चरित्र अभिनेत्री अशा विभिन्न भूमिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेचे सोने करण्याची त्याची खासियत आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्री अरुणा इराणी तब्बल २० वर्षानंतर 'बोल बेबी बोल' या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करताहेत. 'बोल बेबी बोल' या चित्रपटाची निर्मिती त्यांचे बंधू बलराज इराणी यांनी केली असून, दिग्दर्शन स्व. विनय लाड यांनी केलंय. कौटुंबिक धमाल नाट्य असलेल्या या चित्रपटात मराठीतील आघाडीच्या कलाकारांचा अभिनय पहाता येणार आहे. 

'ए. वी. आर. एंटरटेनमेंट' चे विरल मोटानी प्रस्तुत, 'मॅजेस्टिक एंटरटेनमेंट' चे बलराज इराणी निर्मित, 'बोल बेबी बोल' चित्रपटात अरुणा इराणी यांच्यासह मकरंद अनासपुरे, अनिकेत विश्वासराव, नेहा पेंडसे, सिया पाटील, चतुरा मोट्टा, दुर्गेश आकेरकर, मुकेश जाधव, अर्चना गावडे, सुरेश सावंत, पीटर एरोल, दिप्ती प्रकाश, विजय चव्हाण, संतोष मयेकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. अरुणा इराणी यांनी या सिनेमात दुर्गादेवी या घरंदाज स्त्रीची महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारली आहे. एक खोटे लपवताना अनेकदा आणखी खोटे बोलले जाते, त्यामधून उडणारा गोंधळ आणि त्या साऱ्यातून शेवटी समोर येणारे सत्य या कथा आशयावर या सिनेमाचे कथानक बेतलंय. चित्रपटाची कथा राजन अग्रवाल यांनी लिहिली असून पटकथा राजन अग्रवाल, स्व. विनय लाड, संजय बेलोसे यांची तर संवाद संजय बेलोसे यांनी लिहिलेत. विवेक आपटे लिखित यातील गीतांना निशिकांत सदाफुले यांनी संगीत दिलं असून आनंद शिंदे, वैशाली सामंत, संजीवनी भेलांडे, अमृता नातु, रेश्मा, राहुल सक्सेना या गायकांच्या आवाजात ती स्वरबद्ध करण्यात आली आहेत. समीर आठल्ये यांनी 'बोल बेबी बोल' चे छायांकन केले असून कला दिग्दर्शन इजाज शेख, रवी यांनी केले आहे. 

'बोल बेबी बोल'मधील दुर्गादेवीची कुटुंबवत्सल, शिस्तप्रिय व तितकीच कडक व्यक्तिरेखा साकारायला अरुणा इराणी यांनी मराठीसाठी खूप मेहनत घेतली आहे. २० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर त्या मराठीत पुनरागमन करीत असल्याने त्यांच्या भूमिकेविषयीचे कुतूहल निश्चितच वाढले आहे. येत्या ६ नोव्हेंबरला 'बोल बेबी बोल' हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 

No comments:

Post a Comment