Saturday, September 27, 2014

नाते संबंधावरील गणितावर भाष्य करणारा ''सिद्धांत''

नाते संबंधावरील गणितावर भाष्य करणारा ''सिद्धांत''
सिनेमा हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्यातून सामाजिक संदेश समाजातील लोकांपर्यंत पोहचवून सकारात्मक बदल घडवून आणण्याचा अतिशय उत्तम प्रयत्न मराठीतील एक सिनेनिर्मिती संस्था करत असून त्यांच्या या प्रयत्नांना रसिक प्रेक्षकांची ही तेवढीच वाहवा मिळत आहे. आजवर शाळा, अनुमती, फॅन्ड्री अशा एकाहून एक सरस कलाकृतीतून तयार करून केवळ मनोरंजनात्मक नव्हे तर सामाजिक संदेश दिणारी सिनेनिर्मिती संस्था म्हणजे 'नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल'.
नवलखा आर्ट्स आणि होली बेसिलच्या निलेश नवलखा  आणि विवेक कजारिया यांच्यासोबत  अमित अहिरराव यांनी 'सिद्धांत' या आगामी सिनेमाची निर्मिती केली असून 'सिद्धांत' सिनेमाची निवड मानाच्या समजल्या जाणाऱ्या १६व्या 'मामी' फिल्म फेस्टिवलच्या 'इंडिया गोल्ड २०१४' विभागात करण्यात आली आहे. येत्या १४ ऑक्टोबरपासून  २१ ऑक्टोबर दरम्यान हा सोहळा रंगणार आहे.  
गणित हा एक असा विषय आहे जो प्रत्येकाच्या पचनी पडत नाही. पण अभ्यासातील या गणिताचा आयुष्यातील नात्यांशी ही तेवढाच जवळचा संबंध आहे.  नाती जमतात म्हणून गणित सुटतात, का गणित सुटतात म्हणून नाती जमतात,  त्यामुळेच गणित हा विषय जरी आवडत नसला तरी आयुष्यातील नाती टिकविण्यासाठी गणिता सारख्या पद्धातीशी  मैत्री करण्याशिवाय काही पर्याय नाही. एकंदरीतच नाते संबंधातील गणितावर भाष्य करणारा असा 'सिद्धांत' सिनेमा असून सिनेमाचे दिग्दर्शन विवेक वाघ यांनी केले आहे. सिने दिग्दर्शनातील त्यांचे हे पहिलेच पाऊल असून 'शाळा' सिनेमाची निर्मिती तसेच आजवर अनेक सिनेमांसाठी क्रिएटीव्ह हेड म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
'सिद्धांत' सिनेमात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, गणेश यादव, किशोर कदम, स्वाती चिटणीस, नेहा महाजन, सारंग साठे, माधवी सोमण आणि बालकलाकार अर्चित देवाधर अशी या सिनेमाची स्टारकास्ट असून यांचा उत्तम अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेखर ढवळीकर यांनी या सिनेमासाठी पटकथा- संवाद   लिहिले  असून सिनेमातील गाणी सौमित्र अर्थात किशोर कदम यांनी लिहिली आहेत. संगीतकार शैलेंद्र बर्वे यांनी या सिनेमाला संगीत दिले असून नुकतेच सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात या सिनेमातील एक गीत रेकॉर्ड करण्यात आले आहे.
नुकत्याच सोशल साईट्सवर पोस्ट करण्यात आलेल्या 'सिद्धांत' सिनेमाच्या पोस्टरने मनोरंजन क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली असून रसिक प्रेक्षकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.    



No comments:

Post a Comment