Saturday, September 20, 2014

अमेरीकेत मंगेश हाडवळे यांच्या चित्रपटांचा महोत्सवमराठी कलावंत त्यांच्या उपजत कलाकौशल्यांमुळे आज जागतिक पातळीवर गौरविले जाताहेत. त्यांच्या दर्जेदार कलाकृतींची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असलेली किर्ती महाराष्ट्रासोबत भारतासाठी देखील अभिमानास्पद आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक मंगेश हाडवळे यांच्या कामाची दखल आता अमेरीकेत स्थायिक असलेल्या मराठी माणसांनी घेतली आहे. मंगेश यांच्या टिंग्या आणि देख इंडियन सर्कस ( हिंदी ) ह्या चित्रपटांनी ह्या पूर्वीच अनेक राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय पारितोषिके मिळालेली आहेत. विशेष म्हणजे ह्या दोन्ही फिल्मसाठी त्यांना राष्ट्रपती पारितोषिक देखील मिळालेले आहे. मंगेश यांनी लिहिलेला, प्रस्तुत केलेला आणि क्रिएटीव्ह निर्माता म्हणून बनवलेला लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि मैत्रेय मास मिडिया निर्मित 'टपाल' हा चित्रपट २६ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या तीन चित्रपटांचा महोत्सव २६ सप्टेंबर ते ऑक्टोबर ह्या कालवधीत अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील महत्वाच्या शहरांत तसेच शिकागो शहरात होत आहे


अमेरिकेत होणाऱ्या महोत्सवाविषयी मंगेश यांनी सांगितले कि, 'माझ्यासाठी हा अत्यंत महत्वाचा महोत्सव आहे; कारण मी अमेरिकेत किंवा इतर अनेक देशांत ह्या पूर्वी गेलो आहे. परंतु फक्त माझ्याच चित्रपटांचा महोत्सव पहिल्यांदा होत आहे, तेंव्हा ही आपणा सर्वांसाठीच सन्मानाची गोष्ट आहे'. अमेरिकेत स्थायिक झालेले मराठी उद्योजक श्रीनिवास ठाणेदार ह्यांच्या संकल्पनेतून हा चित्रपट महोत्सव साकारत आहे. ठाणेदार यांनी ह्या पूर्वीही मराठी कला, साहित्य आणि संस्कृतीचे अमेरिकेत संवर्धन होण्यासाठी अनेक कार्यक्रम केलेले आहेत. ठाणेदार यांनी माझे चित्रपट ह्या पूर्वीच बघितलेले होते आणि ह्या कलाकृती अमेरिकेत स्थायिक असलेल्या मराठी प्रेक्षकांनी बघाव्यात अशी त्यांनी ईच्छा व्यक्त केली आणि मला अमेरिकेत येण्याचे निमंत्रण दिले. अमेरिकेत स्थायिक असलेल्या मराठी लोकांच्या मराठी यु.एस. . (USA) ह्या संस्थेच्या अंतर्गत हा चित्रपट महोत्सव साजरा होणार आहे ह्या साठी २६ सप्टेंबरला मंगेश हाडवळे अमेरिकेसाठी रवाना होणार आहेत

No comments:

Post a Comment