Tuesday, July 8, 2014

चित्रीकरणापूर्वीच गाण्याची रिंगटोन

चित्रीकरणापूर्वीच गाण्याची रिंगटोन
मराठी चित्रपटाचा मार्केटिंगचा नवा मंत्र




मराठी चित्रपटांची संख्या वाढत असताना तिकीटबारीवर मात्र आजही बहुसंख्य चित्रपट अपयशी ठरताना दिसत आहेत. मार्केटिंग तंत्राचा अभाव किंवा सपशेल चुकीचे मार्केटिंग हे याचे प्रमुख कारण आहे. यापासून धडा घेऊन जागरुक झालेले काही निर्माते आणि दिग्दर्शक आपला चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा आणि प्रदर्शनपूर्व प्रसिद्धी चांगली व्हावी, यासाठी निक्षून प्रयत्न करताना दिसू लागले आहेत. त्यासाठी अनेक तंत्रांचा, आयुधांचा वापर केला जात आहे. मात्र, आता ‘भाई कोतवाल’ या चरित्रपटाच्या निर्मात्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत चित्रीकरणाला सुरुवात होण्यापूर्वीच चित्रपटातील एका गाण्याची रिंगटोन संगीतप्रेमींना उपलब्ध करून दिली आहे.
देई तूच घाव, मुखी तुझे नाव
मनी एक भाव, रात्रंदिन...
असे आर्त शब्द व भाव असलेले हे भक्तिगीत इब्राहिम अफगाण यांच्या लेखणीतून उतरले आहे. अमर मोहिले यांनी स्वरबद्ध केलेल्या या गाण्याच्या निमित्ताने राहुल देशपांडे आणि देवकी पंडित हे शास्त्रीय संगीतातील दोन दिग्गज गायक प्रथमच एकत्र आले आहेत. हंगामा.कॅामने या गाण्याची रिंगटोन तयार केली असून ती अल्पावधीतच चांगलीच लोकप्रियही झाली आहे.
यासंदर्भात चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक एफ. एम. इलियास म्हणाले, “मराठी चित्रपटांच्या बाबतीत संगीताकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं जातं. खरं तर चित्रपटाच्या यशात संगीताचा मोठा वाटा असतो. त्यामुळे गाण्यांच्या मेकिंगपासून मार्केटिंगपर्यंत मेहनत घेण्याची गरज असते. ‘भाई कोतवाल’ च्या संगीतावर आम्ही ही मेहनत घेत आहोत. सध्या एक भक्तिगीत ध्वनिमुद्रित झाले असून त्याची रिंगटोन तयार करून त्याद्वारे ते अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि या आमच्या प्रयत्नांत हंगामा.कॅामनेही आम्हाला चांगली साथ दिली आहे.
हंगामा.कॅामचे मार्केटिंग हेड जयेश चव्हाण म्हणाले, “चित्रपटाचे चित्रिकरणही सुरू झाले नसताना रिंगटोनच्या माध्यमातून गाणे उपलब्ध करून देण्याची संकल्पना ही एफ. एम. इलियास यांची आहे. हिंदीतही आजवर कधी असा प्रयत्न झाला नव्हता. मात्र, चित्रपटाच्या यशात गाण्यांचं असलेलं महत्त्व पाहाता एक स्ट्रॅटेजी म्हणून भविष्यात याचा वारंवार वापर झालेला पाहायला मिळेल. त्याची सुरुवात एखाद्या हिंदी चित्रपटाच्या गाण्याने न होता ‘भाई कोतवाल’ या मराठी चित्रपटाने होत आहे, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. मराठी चित्रपटांनी नेहमीच प्रयोगशीलतेला वाव दिला आहे. हा त्याचाच एक पुढचा टप्पा आहे.

‘भाई कोतवाल’विषयी


चरित्रपटांनी हॅालिवुडचं एक दालन समृद्ध केलं असलं तरी मराठीत हा चित्रप्रकार फारसा हाताळला गेलेला नाही. जे काही थोडे प्रयत्न झाले, ते रिसर्च आणि कल्पकतेच्या अभावामुळे कमालीचे तोकडे पडल्याचेही दिसून आले. या पार्श्वभूमीवर अर्जुनफेम दिग्दर्शक एफ. एम. इलियास यांनी आता कायदेशीर मार्गांपासून ते गनिमी काव्यापर्यंत ब्रिटिशांना सर्व साधनांनिशी नामोहरम करणारे श्रेष्ठ स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा भाई कोतवाल यांचे चरित्र रुपेरी पडद्यावर मांडण्याचे आव्हान स्वीकारले आहे. माथेरानसारख्या इंग्रजांनीच वसवलेल्या हिलस्टेशनचे उपनगराध्यक्ष ते इंग्रजांच्याच दमनशक्तीविरोधात उभे ठाकून गनिमी काव्याने त्यांना हैराण करत हौतात्म्य पत्करणारे लढवय्ये हा त्यांचा प्रवास एखाद्या थ्रिलरपटातील नायकाला शोभेल असाच आहे. कोणासाठी ते कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देणारे वकील होते, शेतक-यांसाठी ते त्यांच्या हक्कांसाठी भांडणारे भूमिपुत्र होते, कोणाला त्यांच्यात राॅबिनहूड दिसत होता, तर ब्रिटिशांसाठी ते गनिमी काव्याने लढणारे क्रांतिकारक होते. दळणवळणाची कुठलीही साधने नसताना, केवळ भारतमातेवरील प्रेमापोटी भरल्या संसारावर पाणी सोडून भाई कोतवाल स्वातंत्र्यवेदीवर हसत हसत बळी गेले. मात्र, असंख्य स्वातंत्र्यसेनानींप्रमाणेच भाई कोतवाल यांची ही देदिप्यमान आणि रोमहर्षक गाथा काहीशी दुर्लक्षित राहिली आहे. त्यामुळेच भाईंचे हे कार्य नव्या पिढीपुढे आणण्यासाठी वीर कोतवाल फाउंडेशनच्या वतीने शशिकांत चव्हाण हे भाई कोतवाल या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. एफ. एम. इलियास आणि इब्राहिम अफगाण यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाला अमर मोहिले यांचे संगीत आहे. छायालेखनातून स्वातंत्र्यपूर्व काळ साकारण्याची जबाबदारी नजीब खान यांनी घेतली आहे.

No comments:

Post a Comment