Thursday, May 8, 2014

प्रेमाच्या मैदानात रंगणार 'हुतूतू'चा सामना 'हुतूतू'चेम्युझिक लॉंच

प्रेमाच्या मैदानात रंगणार 'हुतूतू'चा सामना
'हुतूतू'चे म्युझिक लॉंच     

'हुतूतू' तांबड्या मातीतला अस्सल मराठमोळा खेळ. खेळ तसा जुनाच, पण रोज नव्याने, नव्या मातीवर रंगणारा. कांचन अधिकारी दिग्दर्शित 'हुतूतू' या मराठी सिनेमात खेळाचा आखाडा नसला तरी नात्यांची अनोखी धोबीपछाड अनुभवायला मिळणार आहे. नाती रक्ताची असो वा मनाने गुंतलेली त्यात प्रेमाचा ओलावा असेल तर ते कुठेही आणि कधीही फुलून येते. नातेसंबंधातील अशाच भन्नाट डावपेचावर बेतलाय 'हुतूतू' हा धम्माल विनोदी चित्रपट. हर्षवर्धन भोईर व भाऊसाहेब भोईर निर्मित हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, तत्पूर्वी यातील सुरेल गीतांची ध्वनीफित विधान परिषदेचे उपसभापती मा. श्री. वसंत डावखरे यांच्याहस्ते प्रकाशित करण्यात आली. यावेळी मा. शर्मिला ठाकरे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. विजय कोंडके यांच्यासह चित्रपटातील कलाकार- तंत्रज्ञ आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.   

अशोक सराफवर्षा उसगांवकरजितेंद्र जोशीहेमंत ढोमेनेहा पेंडसेमानसी नाईकअनंत जोगप्रदीप पटवर्धनजयवंत भालेकर,तुल तोडणकरसंजय खापरे आणि कांचन अधिकारी अशा अभिनय संपन्न कलाकारांची तगडी फौज या सिनेमात एकत्र आली आहे. खेळ आणि जीवन यात बऱ्याचदा साम्य पहायला मिळतं. त्याग, समर्पणाला प्रेम मानणाऱ्या जुन्या पिढीचा एक संघ आणि प्रेम मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या नव्या पिढीचा दुसरा संघ. दोन पिढ्यांतील हा संघर्ष 'हर्ष फिल्मस' निर्मित 'हुतूतू' सिनेमातून आपल्यासमोर विनोदी ढंगात उलगडणार असून आशिष पाथरे यांनी त्याचे लेखन केलंय. बऱ्याच कालावधीनंतर कांचन अधिकारी या चित्रपटातून अभिनय करताना दिसणार आहे.

मनोरंजनाचे परिपूर्ण नाट्य असलेल्या या चित्रपटाची गीते प्रकाश राणे यांनी लिहिली असून हिंदीतील सुप्रसिद्ध संगीतकार आनंद राज आनंद यांनी संगीत दिलंय, तर पार्श्वसंगीताची साथ नितीन हिवरकर यांनी दिली आहे. वैशाली सामंत, विशाल मिश्रा, ऐश्वर्या निगम, अर्पिता चक्रवर्ती, भरत गोएल या गायकांच्या सुमधूर आवाजात ती स्वरबद्ध करण्यात आली आहेत. या ध्वनीफितीत 'हुतूतू' हे शीर्षक गीत, 'लाडीगोडी' व 'लैला मेरी लैला' या तीन गीतांसोबत संगीतकार आनंद राज आनंद यांचे संगीत असलेल्या लोकप्रिय हिंदी गीतांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. यात माही वे (कांटे), दिल दे दिया है (मस्ती), जाने क्या होगा रामा रे (कांटे), शकीला बनो (जंजीर), जुल्मी जुल्मी (ग्रॅंड मस्ती) आणि आनंद राज आनंद यांनी लिहिलेल्या जलेबी बाई (डबल धमाल) या ताल धरायला लावणाऱ्या गीतांचा समावेश आहे. कला दिग्दर्शन राजू साप्ते, छायांकन सुरेश देशमाने, संकलन आनंद दिवाण यांनी केले असून नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव व दिलीप मिस्त्री यांनी केलंय. 

प्रेमाच्या मैदानात 'हुतूतू'चा विनोदी सामना कोण जिंकणार हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल त्यापूर्वी यातील गीते नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील.      

No comments:

Post a Comment