Tuesday, May 6, 2014

‘इंडस सिने प्रॉडक्शन’ मराठी निर्मितीत

इंडस सिने प्रॉडक्शन मराठी निर्मितीत 
आशयघनता आणि व्यावसायिक गणितं याची उत्तम सांगड घालीत यशाच्या पायऱ्या चढणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीचा आलेख चढता आणि गौरवशाली राहिला आहे. प्रेक्षकांची हमखास करमणूक होईल, सोबत सशक्त विषयही उत्तम सादरीकरणातून मांडण्याची खबरदारी नव्या फळीचे निर्माता- दिग्दर्शक घेताना दिसताहेत. यात आता अनेक कार्पोरेट कंपन्या देखील मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी उत्साही दिसतात. याच पंक्तीत हिंदीतील प्रतिष्ठीत निर्मिती संस्था असलेली इंडस सिने प्रॉडक्शन चे नाव दाखल झालं आहे. मुंबईत एका शानदार समारंभात या कंपनीने मराठी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आपल्या ४ महात्वाकांशी सिनेमांची घोषणा केली. मराठी सोबत हिंदीतील अनेक नामवंत कलाकार यावेळी आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हिंदीतील ज्येष्ठ अभिनेते अंजन श्रीवास्तव, लोकप्रिय मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेत्री मुग्धा गोडसे, प्रसिद्ध साहित्यिक फ.मुं. शिंदे, दिग्दर्शक शिव कदम, संगीतकार कनकराज आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

विषयात वैविध्य आणून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी इंडस सिने प्रॉडक्शन’ ही निर्मिती संस्था प्रयत्नशील आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रंगलेल्या या दिमाखदार सोहळ्यात आपलं मनोगत व्यक्त करताना प्रसिद्ध दिग्दर्शक शिव कदम म्हणाले की, इंडस सिने प्रॉडक्शनने हिंदी तसेच भोजपुरी भाषांमध्ये अनेक आशयघन कलाकृतींची निर्मिती केली असून या सर्वच चित्रपटांना रसिकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. आता आम्ही पहिल्यांदाच भाषिक चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत असून या उपक्रमाची सुरूवात मराठीपासून होत असल्याचा मला अभिमान वाटतो. आपल्या दर्जेदार चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवलेल्या इंडस सिने प्रॉडक्शन’ च्यावतीने आगामी काळात चार महत्त्वाकांक्षी चित्रपटांची निर्मिती करण्यात येणार असून यात तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. 

टीनएज लव्हस्टोरी असलेला ड्रीम डेट’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट असून यात, मनातली छोटीशी इच्छा व्यक्त करताना उडालेली धमाल आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये मकरंद अनासपुरे प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. त्यांच्या दुसऱ्या चित्रपटाचे नाव भिन्नाट असून यामध्ये दोन अवलिया व्यक्तिरेखांची सुसाट भ्रमंती आपल्याला पहायला मिळेल. या सिनेमात मकरंद अनासपुरे हटके अंदाज आणि वेगळ्या गेटअपमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या दोन्ही चित्रपटांची निर्मिती अरुणेश करणार असून दिग्दर्शनाची धूरा शिव कदम या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने उचलली आहे. यातील ड्रीम डेट’ चित्रपटासाठी गीतलेखन प्रख्यात साहित्यिक व गीतकार फ.मुं. शिंदे यांनी केले असून सुमधूर संगीताची साथ संगीतकार कनकराज देणार आहेत. त्यानंतर इंडस सिने प्रॉडक्शन’चा जय तारी दिग्दर्शित कोंबडी पळाली रे या तिसऱ्या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त 'डेंजर फेसबुक' या हिंदी सिनेमाची निर्मिती करण्यात येणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्येष्ठ दिग्दर्शक मनोज नारायण करणार आहेत. 
                     
या चारही चित्रपटांच्या चित्रीकरणास लवकरच सुरुवात होणार असून इंडस सिने प्रॉडक्शन’च्या वतीने आगामी काळात सकस, अर्थपूर्ण चित्रपटांची पर्वणी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

No comments:

Post a Comment