Tuesday, May 27, 2014

"मराठी बॉक्स क्रिकेट लीग"मध्ये कलाकारांचा जलवा २८ आणि २९ मे ला लवासात खेळ आणि कलेचा मिलाप

"मराठी बॉक्स क्रिकेट लीग"मध्ये कलाकारांचा जलवा
२८ आणि २९ मे ला लवासात खेळ आणि कलेचा मिलाप   
'महाराष्ट्र कलानिधी' यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'मराठी बॉक्स क्रिकेट लीग' स्पर्धा येत्या २८ व २९ मे ला निसर्गरम्य अशा लवासा मध्ये रंगणार आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक आघाडीचे कलाकार या स्पर्धेत खेळणार असून विशेष म्हणजे अभिनेत्री देखील यात सहभागी आहेत. आठ संघामध्ये हा सामना रंगणार असून २८ मे ला याची दमदार सुरवात होईल. मस्त पुणे (सौ पूनम शेंडे ), डॅशिंग मुंबई (श्री अमेय खोपकर), फटाका औरंगाबाद (श्री पंकज जैन), शिलेदार ठाणे (श्री उत्तुंग ठाकूर), शूर कोल्हापूर (श्री अमर पाटील), क्लासिक नाशिक (श्री अंकित मगरे ), कोहिनूर नागपूर (श्री पंकज भोईर ),रत्नागिरी टायगर्स (श्री सुशांत शेलार) अशा ८ संघांमध्ये क्रिकेटची ही चुरस रंगणार आहे या आठही संघात कलाकारांच्या शहराप्रमाणे त्यांची विभागणी करण्यात आली आहे. 

महेश मांजरेकर, चंद्रकांत कुलकर्णी, नेहा पेंडसे, संजय जाधव, मेधा मांजरेकर, सुबोध भावे, मनवा नाईक, क्रांती रेडकर, अमृता खानविलकर, सिद्धार्थ जाधव, पूर्वा पवार, अजित परब, शशांक केतकर, विशाल इनामदार असे अनेक लोकप्रिय कलाकार पुण्यात लवासा येथे होणाऱ्या 'मराठी बॉक्स क्रिकेट लीग'मध्ये सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या सुरवातीला MBCL चं थीम सॉंग सादर होऊन दिवसाला आठ मॅचेस होतील. २८ मे ला सुरु झालेल्या या स्पर्धेचा समारोप २९ मे ला होईल. मनोरंजनाचे नवे परिमाण निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे मत 'महराष्ट्र कालानिधी'चे संस्थापक नितेश राणे यांनी व्यक्त केले. लवासाला कला आणि संस्कृतीचे प्रख्यात केंद्र बनवण्यासाठी आम्ही ही स्पर्धा लवासाला भरवली असल्याचं 'लवासा कॉर्पोरेशन लिमिटेड' चे अध्यक्ष आणि सीईओ श्री. नेथन यांनी सांगितलं. 

सध्या क्रिकेटचा सराव करण्यात ही सर्व कलाकार मंडळी गुंतली असून कोणता संघ जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या स्पर्धेची लोकप्रियता वाढावी यासाठी याचे फेसबुक व ट्विटर अकाऊंट काढण्यात आलं असून संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा छायाचित्रांसह पाहता येईल. मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या सामन्यांचे प्रसारण '९ एक्स झकास'वरून होणार आहे.










No comments:

Post a Comment