Friday, May 16, 2014

शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा वेध घेणारा चित्रपट 'भाकर'

शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा वेध घेणारा चित्रपट 
'भाकर' 

शेतकरी..  आपला अन्नदाता..  उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ साधत गेली वर्षानुवर्षे संसाराचा गाडा रेटणारा बळीराज कायमच आर्थिक विवंचनेत अडकलेला राहिला. सावकाराचे कर्ज, वादळ-गरपीटासारखी आस्मानी संकट झेलत राबणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरी नेहमीच उपेक्षा आली. उपजीविकेचे एकमेव साधन असलेली शेती आणि त्यातूनच आलेल्या कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास धजावतो, तर काही वाममार्गाला लागतो. विदर्भातील शेतकऱ्यांच्या याच प्रश्नांचा वेध घेणारा 'भाकर' हा मराठी चित्रपट येऊ घातलाय. 'तिरुपती बालाजी मोशन पिक्चर्स' प्रस्तुत 'वऱ्हाड चित्र' निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय पोहनकर यांनी केलंय. 

'जगाचा पोशिंदा जगाचा विनाशक झाला तर.. ' या टॅग लाईनवर बेतलेला 'भाकर' चित्रपट येत्या २३ मे ला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय. 'महेंद्र पवनकुमार सिंह आणि टीम' प्रस्तुत या चित्रपटाची सहनिर्मिती चंद्रशेखर पिंपळे, चंद्रकांत मेहेरे यांनी केली आहे. 'भाकर' हा चित्रपट म्हणजे विदर्भातील शेतकऱ्यांची जीवन जगण्याची कहाणी आहे. शेतकऱ्यांची होणारी फरपट, भौगोलिक परिस्थितीचा वेळेचा-काळाचा अभ्यास न करता येणारी पॅकेजेस, नैसर्गिक असमतोलता, आर्थिक फसवणूक, राजकारण यामुळे आत्महत्या करणारा शेतकरी तर दुसरीकडे त्याच्यातील तरून पिढी यातून बाहेर पडण्यासाठी वाईट मार्गाकडे वळते.. अशाच एका गावातील हताश तरुण एकत्र येतात व त्यांना साथ मिळते भाऊची. दोन पिढ्यांतील विचारांचा संघर्ष सुरु होतो. यातील एक गट नक्षलवादाकडे वळतो. वेगळ्या धाटणीची वास्तवदर्शी कथा या चित्रपटातून रेखाटण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणतो, तोच जर जगाचा विनाशक झाला तर.. आपल्या पोटाला 'भाकर' कोठून मिळणार. हा मध्यवर्ती विषय या सिनेमातून हाताळण्यात आला आहे. 

किशोर कदम, नितीन भजन, आशुतोष भाकरे, जयेश शेवलकर, संजय कुलकर्णी, पूर्णिमा वाव्हळ यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शक विजय सहदेव पोहनकर यांनी केलंय. छायाचित्रण राजा फडतरे यांनी केले असून संकलन दिनेश मेंगडे यांचे आहे. सौ. कविता पिंपळे लिखित यातील गीतांना रोहित नागभिडे यांनी संगीत दिले असून ज्ञानेश्वर मेश्राम, नंदेश उमप, मधुरा कुंभार या गायकांच्या सुमधूर स्वरात ही गीते ध्वनीमुद्रित करण्यात आली आहेत. मनोरंजनाच्या माध्यमातून एक गंभीर प्रश्न 'भाकर' सिनेमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येत असून येत्या २३ मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 


 



No comments:

Post a Comment