Tuesday, April 15, 2014

लक्स झक्कास हिरोईन मध्ये रंगली नृत्याची जुगलबंदी

लक्स झक्कास हिरोईन मध्ये रंगली नृत्याची जुगलबंदी 

अभिनयासोबत नृत्य, गायन आणि फिटनेस यांना सध्या अनन्यसाधारण महत्त्व आलंय. चित्रपटांत लावणी ते आयटम सॉंगपर्यंत झालेला नृत्याचा प्रवास आणि त्यात होणारे नावीन्यपूर्ण बदल हे वाखाणण्याजोगे आहेत. ही बाब अचूक हेरत ९ एक्स झक्कास वाहिनीने आपल्या लक्स झक्कास हिरोईन मधील स्पर्धक तरुणींच्या सर्वांगीण विकासासाठी असाच एक वेगळा सेगमेंट ठेवला होता. ज्यात महाराष्ट्रातून निवडलेल्या १० तरुणींना प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर यांचे मौल्यवान मार्गदर्शन लाभले. त्यादरम्यान झालेली नृत्याची लयलूट आणि जुगलबंदी येत्या शनिवारी १९ एप्रिलला रात्री ९.०० वा. ९ एक्स झक्कास वाहिनीवर तुम्ही पाहू शकता. 

दिवसागणिक वाढत जाणारी लक्स झक्कास हिरोईन किताबासाठीची ही चुरशीची स्पर्धा आता निरनिराळ्या भागांत विभागण्यात आली आहे. चित्रपटांमध्ये नृत्याला असणारी मागणी त्यानुसार होणारे प्रयोग आणि फिटनेस याची जाण फुलवा खामकर यांनी स्पर्धक तरुणींना करून दिली. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी फिटनेस आणि एकाग्रतेची आवश्यकता पाहता या तरुणींकरिता खास फिटनेस सेशन घेतलं गेलं. यावेळी फुलवा खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच जणींचे दोन गट पाडण्यात आले. त्यांनी एका गटाला लावणी तर दुसऱ्या गटाला आयटम सॉंग शिकवलं. फुलवा खामकर यांच्यासमवेत या तरुणींनी लावणीचा ठेका आणि आयटम सॉंगचा लगावलेला तडका पाहण्यासारखा आहे. 

हा एलिमिनेशन राउंड असल्याने प्रत्येक तरुणीने सादर केलेल्या परफोर्मन्सचे अभिनेत्री स्मित तांबे आणि नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव यांनी परीक्षण केलंय. एलिमिनेशन राउंडदरम्यान दोन जणींचा प्रवास संपणार असला तरी एकीला वाईल्ड कार्डद्वारा पुन्हा प्रवेश दिला जाणार आहे. दहा जणींपैकी कोणत्या तरुणीचा प्रवास संपणार आणि कोणाला लक्स झक्कास हिरोईन स्पर्धेत परतण्याची संधी मिळणार याची उत्सुकता येत्या शनिवारी १९ एप्रिलला संपुष्टात येईल. 

९ एक्स झक्कास संगीत वाहिनीवर आयोजित करण्यात आलेल्या या टॅलेंट हंटमधून मीनाक्षी सागर प्रोडक्शनच्या मितवा या पहिल्याच मराठी सिनेमासाठी दुसऱ्या हिरोईनचा शोध घेण्यात येत आहे. लोकप्रिय अभिनेता स्वप्नील आणि सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिका असलेल्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे-जोशी करीत आहेत. प्रत्येक भागात होणाऱ्या विविधांगी स्पर्धांना मत देत लक्स झक्कास हिरोईन चा किताब कोण जिंकणार..? हे जाणण्यासाठी दर शनिवारी रात्री ९. ०० वा. ९ एक्स झक्कास वाहिनीवर लक्स झक्कास हिरोईन पहायला विसरू नका.

No comments:

Post a Comment