Tuesday, May 6, 2014

AJOBA

'जोबा' ची भन्नाट जंगल सफारी 
९ मे ला राज्यात सर्वत्र 
 


मराठी चित्रपटांमध्ये नवनवीन विषय आणि वेगळ्या पद्धतीची मांडणी आणण्याचा प्रयत्न केला जातोय. सुजय डहाके दिग्दर्शित 'आजोबा' हा याच पंक्तीतील बहुचर्चित चित्रपट आहे. 'आजोबा' चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे या सिनेमातून प्रथमच एक 'बिबट्या' चित्रपटाचा हिरो म्हणून झळकणार आहे. मुंबईतील आरे कॉलनीत बिबट्यांच्या हल्ल्याच्या बातम्या वारंवार ऐकू येतात. बिबटे मानवी वस्तीत अतिक्रमण करतात कि आपण त्यांचा नैसर्गिक रहिवास हिरावून घेतला आहे, हा गंभीर प्रश्न वेळोवेळी उपस्थित केला जातो. जितका जगण्याचा हक्क आपल्याला आहे, तितकाच त्यांनाही आहे. याच प्रश्नांवर भाष्य करणारा 'आजोबा' येत्या ९ मे ला राज्यात सर्वत्र झळकतोय. मराठीत प्रथमच या विषयावर सिनेमाची निर्मिती झाली असून याची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. 

'शाळा'च्या यशानंतर सुजय डहाके यांचा 'आजोबा' हा दुसरा चित्रपट असून तो दर्जेदार असण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. 'एल.व्हि.शिंदे ग्रुप' व 'सुप्रिम मोशन पिक्चर्स प्रा. लि.' ची निर्मिती असलेल्या या सिनेमामुळे बिबट्यांचे जीवन अधिक चांगल्या रितीने समजून घेता येणार आहे. 'आजोबा' सिनेमाचे खास आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर प्रथमच मराठी सिनेसृष्टीचा पडदा व्यापणार आहे.  या सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत प्रवेश करीत उर्मिला यांनी पूर्वा राव या वन्यजीव अभ्यासिकेची महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. 

वन्यजीवसृष्टीवर बेतलेला हा सिनेमा पहाणे प्रेक्षकांसाठी अनोखी ट्रीट ठरणार आहे, कारण यात बिबट्याच्या चित्रीकरणासोबत महाराष्ट्राचे एरिअल शूटींग पहाता येईल. माळशेज घाट परिसर, निसर्गरम्य लोकेशन्स असलेल्या दऱ्याखोऱ्याचा वन्य परिसरात चित्रपटाचे शुटींग करण्यात आले आहे.  प्राण्यांवर चित्रीकरण करताना काही ठिकाणी मर्यादा येतात त्याठिकाणी ग्राफिक्सचा अचूक वापर करण्यात आला आहे. सिनेमासाठी पुण्याच्याच इल्युशन इथेरिअल या कंपनीने व्हिजुअल इफेक्ट्स काम केले असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्राफिक्स प्रेक्षकांना यात पहायला मिळेल. या सिनेमासाठी परदेशातील कुशल तंत्रज्ञानी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. परदेशातील प्रसिद्ध सिनेमेटोग्राफर दिएगो रॉमेरो, स्क्वारेझ लायनोस यांचे उत्तम कॅमेरा वर्क आपल्याला या सिनेमात पहाता येणार आहे. 

'आजोबा' ची कथा पुण्यात टाकळी-ढोकेश्वर येथे घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारित आहे. कुत्र्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनी सुखरूप बाहेर काढलं. विद्या अत्रे या वन्यजीव अभ्यासिकेने या बिबट्याच्या अंगावर एक चीप बसवून जीपीएस च्या सहाय्याने त्याचा प्रवास टिपण्याचा प्रयत्न केला. त्या चीपवर नाव दिलं गेलं ते म्हणजे… 'आजोबा'. पुढे माळशेजच्या घाटात आजोबाला सोडण्यात आलं. पण सह्याद्रीच्या रांगा ओलांडत हा 'आजोबा' निघाला मुंबईच्या दिशेने. माळशेज घाट ते मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उदयान हे अंतर या 'आजोबा' ने जवळपास साडेतीन आठवड्यात १२० किलोमीटर चालत पार केलं. बिबट्या कुठल्या दिवशी कुठे गेला, हे त्याला बसवलेल्या चीपमुळे अगदी अचूक नोंद होत गेलं. 'आजोबा'चा हा थक्क करणारा धाडसी प्रवास आणि जीपीएस तंत्रज्ञांचा आधार घेत वन्य अभ्यासिकेला बिबट्याचा पाठलाग करताना आलेला थ्रिलिंग अनुभव प्रेक्षकांना या चित्रपटात पाहता येणार आहे. मनुष्यवस्तीच्या अगदी जवळून जातानाही या बिबट्याने कुणावरही हल्ला केला नाही. एखाद्या मायाळू वयस्क व्यक्तीसारखे त्याचे वर्तन होते. यातूनच त्या बिबट्याचे चे नाव 'आजोबा' ठेवण्यात आले. चित्रपटाची ही कथा गौरी बापट यांनी लिहिली असून वेगळ्या धाटणीच्या या सिनेमाला साकेत कानेटकर यांनी संगीत दिले आहे.  निमिश छेडा, अविनाश सोनावणे हे या चित्रपटाचे ध्वनी संयोजक आहेत. प्रसाद वैद्य चित्रपटाचे कार्यकारी निर्माता असून कंपनी लाईन प्रॉडयुसरची जबाबदारी राहुल ओदक व शशांक कुलकर्णी यांनी सांभाळली आहे. 

उर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, हिंदी अभिनेता यशपाल शर्मा, ऋषिकेश जोशी, श्रीकांत यादव, ओम भुटकर, नेहा महाजन, गणेश मयेकर, शशांक शेंडे, अनिता दाते, चिन्मय कुलकर्णी, विराट मडके, अनुया काळसेकर यांच्या भूमिका असलेला बहुचर्चित 'आजोबा' चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच वेगळा अनुभव देईल. येत्या ९ मे ला राज्यभरातील विविध चित्रपटगृहातून 'आजोबा'च्या जंगल सफारीचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे.  


AJOBA

Produced By: Supreme Motion Pictures Pvt Ltd

PRODUCER LALASAHEB SHINDE RAJENDRA SHINDE

 DIRECTED BY SUJAY DAHAKE

SCREENPLAY GAURI BAPAT 

STORY AND DIALOGUES SUJAY DAHAKE -

DIRECTOR OF PHOTOGRAPHY DIEGO ROMERO SUAREZ LIANOS 

EDITOR SUJAY DAHAKE 

MUSIC SAKET KANETKAR

COSTUMES NAMITA GOGATE 

SOUND DESIGN NIMISH CHEDA AVINASH SONAVANE 

VISUAL EFFECTS ILLUSION ETHEREAL

No comments:

Post a Comment