Saturday, July 6, 2024

सागरिका म्युझिकची यशस्वी २५ वर्ष पूर्ण 'नानाछंद' द्वारे सादर करणार नाना पाटेकरांमधील गीतकारसंगीत क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत रंगला २५वा वर्षपूर्ती सोहळा





आजवर विविधांगी संगीताची मेजवानी देत रसिक श्रोत्यांचे कान तृप्त करणारे ‘सागरिका म्युझिक’ हे नाव संगीतप्रेमींसाठी नवं नाही. कॅसेट-सीडीच्या काळापासून संगीतप्रेमींसमोर सुरेल संगीताचा अद्वितीय नजराणा सादर करण्याचे व्रत जोपासणाऱ्या सागरिका  म्युझिकने आजच्या सिंगल्सच्या काळातही रसिकांच्या मनावर गारूड करणारी गाणी सादर केली आहेत. 
संगीत क्षेत्रात यशस्वी २५ वर्ष पूर्ण केल्या निमित्ताने सागरिका म्युझिक च्या वतीने एका भव्य समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. संगीत क्षेत्रातील अनेक नामवंतांनी त्यास आवर्जून हजेरी लावली. आणि सागरिका बाम आणि सागरिका म्युझिकच्या २५ व्या वर्षपूर्तीबद्दल अभिनंदन केले तसेच पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  
संगीत क्षेत्रात २५ वर्षे पूर्ण केल्याचं औचित्य साधत 'नानाछंद' या अल्बमचे अनावरण याप्रसंगी करण्यात आले यावेळी बोलताना हा अतिशय खास अल्बम रिलीज करताना आम्हाला अतिशय आनंद होत असल्याची भावना सागरिकाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. 'नानाछंद' या अल्बममधील गाणी नाना पाटेकर यांनी लिहिली असून, संगीतकार नीलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केली आहेत. वैशाली सामंत, राहुल देशपांडे आणि स्वप्नील बांदोडकर या तीन सर्वोत्कृष्ट गायकांच्या आवाजात ही गाणी रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. या अल्बमची मांडणी-निर्मिती विक्रम बाम यांनी केली आहे. वरद कठापूरकर, सचिन भांगरे, विनायक नेटके आणि इतर प्रतिभावान संगीतकारांनी वादन केलं आहे. अवधूत वाडकर, तुषार पंडित आणि अजिंक्य धापरे रेकॉर्डिंग आणि मिक्स इंजिनिअर आहेत.
‘खरंतर अमराठी असूनही मला मराठी लोकांनी, इथल्या संस्कृतीने मला स्विकारलं. अतिशय मेहनतीने आज ‘सागरिका म्युझिक’ दिमाखात उभी आहे त्याला इथली आत्मियता कारणीभूत आहे. आजवर खूप मोठं पाठबळ मला संगीत क्षेत्रातल्या दिग्गजांनी दिलं ते यापुढेही तसेच राहील यात मला अजिबात शंका नाही, असं मनोगत सागरिका बाम यांनी व्यक्त केलं.
‘मी निसर्गात जास्त रमतो. त्यामुळे त्या सगळ्याशी माझी खूप जवळीक आहे. अनेकदा ते शब्द आपसूक ओठावर येतात. त्या शब्दांना निलेशने अतिशय मेहनतीने सुरांमध्ये गुंफलंय त्यातूनच ही गीत निर्मिती झाली. सागरिका म्युझिक आणि सागरिका बाम यांनी या गीतांना सुंदरतेने एका अल्बमच्या  माध्यमातून  प्रकाशित  केलं आहे.  याचा अतिशय आनंद मला आहे. असे भावोद्गगार ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी काढले.
 या हृदय समारंभात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर गायक सुदेश भोसले यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आणि सागरिका म्युझिकला पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या.
या अल्बमच्या निमित्ताने नाना पाटेकरांमध्ये दडलेला संवेदनशील गीतकार जगासमोर येणार आहे. आजवर अभिनेता-दिग्दर्शक आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नानांची सुरेल बाजू संगीत प्रेमींसमोर आणण्याचं काम सागरिकाच्या माध्यमातून केलं जाणार आहे. सागरिकाचं हे काम नक्कीच वाखाणण्याजोगं असून, वर्षानुवर्षे स्मरणात राहणारं ठरेल

No comments:

Post a Comment