Saturday, September 30, 2017

‘माझा एल्गार’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळामनोरंजनापलीकडे जात चित्रपटांतून अभिव्यक्तीचा शोध घेणारे मराठी चित्रपट मोठ्या संख्येने दिसतायेत. तारुण्याच्या पंखांत आकाशाला गवसणी घालण्याचं बळ असतं. व्यवस्थेविरुद्ध बंड करणारी तरुणाईच असते. भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध एका स्त्रीने केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा माझा एल्गार हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा कलाकार व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. येत्या १० नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सद्गुरू फिल्मस प्रस्तुत माझा एल्गार चित्रपटाचे निर्माते सौरभ आपटे तर प्रस्तुतकर्ते श्रीकांत आपटे आहेत. चित्रपटाची कथा व दिग्दर्शन मिलिंद कांबळे यांचे आहे.

याप्रसंगी बोलताना चित्रपटाचे निर्माते सौरभ आपटे म्हणाले की, समाजाचे आपणही काही तरी देणे लागतो या भावनेतून माझा एल्गार या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. चित्रपट म्हणजे मनोरंजन हे जरी खरे असले तरी त्यातून सामाजिक प्रश्न मांडणेही गरजेच असल्याचं सांगताना हा चित्रपट व यातील गीते प्रेक्षकांना भावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माझा एल्गार चित्रपटात वेगवेगळ्या जॉनरची चार गीते आहेत. बा इठ्ठला तुझं रूप दाव रं’  मनाचा ठाव घेणाऱ्या या गीताला आदर्श शिंदे यांनी स्वरसाज दिला आहे. ‘थांब ना... अजून क्षणभर थांबना’ हे प्रेमगीत सौरभ शेटे व आनंदी जोशी यांनी गायले आहे. अन्याय तुडवण्यासाठी’ या स्फूर्तीदायक गीताला सौरभ शेटेचा आवाज लाभला आहे. आयना का बायना’ हे जोशपूर्ण गाणं अवधूत गुप्तेने गायलं आहे. अभिजीत सकपाळ व मिलिंद कांबळे यांनी ही गीते लिहिली आहेत.

ऐश्वर्या राजेश, स्वप्नील राजशेखर, यश कदम, अमोल रेडीज, अर्चना जोशी, ऋचा आपटे, गांधार जोशी प्रफुल्ल घाग, राजकिरण दळी, गोपाळ जोशी, सचिन सुर्वे, नितीन जाधव, पूजा जोशी, वैदेही पटवर्धन हे कलाकार यात आहेत. चित्रपटाची पटकथा, संवाद चेतन किंजळकर यांनी लिहिले आहेत. छायांकन उमेश पोफळे तर संकलन नकुल प्रसाद प्रज्योत पावसकर यांचे आहे. संगीत सौरभ- दुर्गेश या संगीतकार जोडीने दिले आहे. नृत्यदिग्दर्शन प्राण हंबरडे यांचं आहे. वेशभूषा अरविंद गौड यांची तर रंगभूषा भरत प्रजापती, आरती यांची आहे. जितेंद्र जैस्वारचित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. १० नोव्हेंबरला माझा एल्गार चित्रपटगृहात दाखल होईल.

No comments:

Post a Comment