Thursday, September 3, 2015

गप्पांच्या मैफलीतून उलगडला निशिकांत कामत यांचा दिग्दर्शकीय प्रवास


डॉ. व्ही शांताराम मोशन पिक्चर ट्रस्टचा उपक्रम


रंगभूमी, मालिका, चित्रपट असा तिहेरी प्रवास करणाऱ्या दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या कामगिरीचा आलेखचढताच राहिला आहे. डॉ. व्ही शांताराम मोशन पिक्चर ट्रस्टच्या उपक्रमा अंतर्गत झालेल्या मुलाखतीतून दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी त्यांचा प्रवास उलगडून दाखवताना चित्रपटाचं तंत्र आणि त्याचा अविष्कार याबद्दल चित्रकर्मींशी संवाद साधत प्रत्येक चित्रपटाने व त्या अनुभवाने आपल्याला कसं समृद्ध केलं याविषयी दिलखुलास चर्चा केली.

रंगभूमीवर काम केल्यामुळे समोरच्याच्या मनात नेमकं काय चालू आहे, याची कल्पना मी करू शकतो त्यामुळेच समोरचाच्या मनातलं द्वंद्व ओळखून त्यांचा गोंधळ दूर करत कलाकारांकडून हवा असलेला अभिनय करून घेता येत असल्याचं गुपित ही त्यांनी गप्पांमधून सांगितल. काही तरी नवीन करण्याचा ध्यास मनात घेतल्यावर आपल्या ध्येयावर मर्यादा न घालता त्याचा ध्यास घेत त्यासाठी आवश्यक ती चिकाटी धरावी असा अनुभवी सल्ला दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी आपल्या गप्पांमधून मांडला.

शिकायच्या ऊर्मीने प्रत्येक गोष्ट करायला हवी. आईने लावलेल्या वाचनाच्या सवयीमुळेच मला चित्रपटातून जे म्हणायचे आहे ते प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहचवता येत असल्याची प्रांजळ कबुली ही त्यांनी यावेळी दिली.चित्रकर्मींनी ही निशिकांत कामत यांचा प्रवास जाणून घेत आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरंही निशिकांत कामत यांच्याकडून जाणून घेतली.

निशिकांत कामत यांचा कलाक्षेत्राचा हा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी तर आहेच पण शिकण्याची उर्मी नवीन अविष्कार घडवू शकते हे दाखवून देणारा सुद्धा आहे.निशिकांत कामत यांच्या दिग्दर्शन अनुभवाचे बोल चित्रकर्मींसाठी नक्कीच मोलाचे ठरतील असा विश्वास डॉ. व्ही शांताराम ट्रस्टचे अध्यक्ष श्री. किरण शांताराम यांनी यावेळी व्यक्त केला. 

No comments:

Post a Comment