मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चांगल्या व नाविन्यपूर्ण विषयांवर चित्रपट निर्मिती करण्याची परंपरा आहे. मराठी चित्रपटसृष्टीला येत असलेले चांगले दिवस, आशयाच वैविध्य यामुळे अनेक कॉर्पोरेटस मराठी सिनेमात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक दिसताहेत. या बदलत्या प्रवाहामुळे मराठी चित्रपटाने मुंबई, महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता थेट परदेशात झेप घेतलीये. बॉलिवुडप्रमाणे हॉलिवूडलाही सध्या मराठी चित्रपटांची भूरळ पडली आहे. हॉलीवूडची 'इस्ट वेस्ट फिल्म्स' ही नामांकित कंपनी 'परतु' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटाच्या निर्मितीत उतरली आहे.
दोन देशातल्या कलाकार तंत्रज्ञांचा संगम असणाऱ्या ‘परतु' या चित्रपटाच्या पूर्णत्वाची घोषणा नुकतीचन्यूयॉर्क येथे पत्रकार परिषदेत करण्यात आली. न्यूयॉर्कमध्ये भारतीय दूतावासाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्ञानेश्वर मुळ्ये यांनी ‘परतु' चित्रपटाची घोषणा करत 'परतु' चित्रपटाचं वेगळेपण तसंच हॉलीवूडच्या'इस्ट वेस्ट फिल्म्स' या नामांकित कंपनीच्या माध्यमातून हॉलीवूड व बॉलीवूडचं एक नवं पर्व तयार झाल्याचं यावेळी सांगितलं. चित्रपटाच्या प्रसिद्धी करिता याचा उपयोग होईलचं पण ‘परतु' सारख्या प्रादेशिक चित्रपटांसाठी एक नवं व्यासपीठ यानिमित्ताने उपलब्ध झालं आहे, असं सांगत ‘परतु'चित्रपटाचं कौतुक केलं.
या पत्रकार परिषदेत दिग्दर्शक नितीन अडसूळ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. ‘परतु' चित्रपटाच्या मेकिंग व पोस्टरची झलक उपस्थितांना दाखवण्यात आली. तसेच गप्पांच्या माध्यमातून ‘परतु' चित्रपटाविषयी जाणून घेतलं. गेली अनेक वर्ष अमेरिकेत वास्तव्यास असणारे दिग्दर्शक नितीन अडसूळ यांनी ‘परतु' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा क्लार्क मॅकमिलिअन, नितीन अडसूळ व डेरेल कॉक्स यांनी लिहिली असून याचे मराठी संवाद लेखन मयुर देवल यांनी केलं आहे. संकलनाची जबाबदारी राजेश राव यांनी सांभाळली आहे. सत्यकथेवर आधारित असलेल्या ‘परतु' चित्रपटात १९६८ ते १९८५ दरम्यानचा काळ रेखाटण्यात आला असून प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीचा कथाविषय या निमित्ताने पहाता येणार आहे.
संजय खानझोडे यांनी चित्रपटाचे छायाचित्रण केले असून संगीतकार शशांक पोवार यांनी चित्रपटाला साजेशी संगीताची साथ दिली आहे. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी 'परतु' चित्रपटाचे थीम साँग गायले असून ग्रेग सिम्स या हॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीत संयोजकाने ‘परतु' ला पार्श्वसंगीत दिले आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते म्हणून नितीन अडसूळ, सचिन अडसूळ, रुपेश महाजन, डेरेल कॉक्स, क्लार्क मॅकमिलिअन हे काम पहात आहेत. किशोर कदम, स्मिता तांबे, सौरभ गोखले, गायत्री देशमुख, अंशुमन विचारे, नवनी परिहार, राजा बुंदेला रवी भारतीय आणि बालकलाकार यश पांडे अशा दिग्गज कलाकारांच्या ‘परतु' सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
'
इस्ट वेस्ट फिल्म्स' ही अमेरिकेतील नामांकित मल्टीमिडिया कंपनी असून निर्मिती, वितरण, वेब मिडिया,टेलीव्हिजन अशा विविध माध्यमांतून या कंपनीचा जगभरात नावलौकिक आहे.
लवकरच 'परतु' आपल्या भेटीस येणार आहे.
No comments:
Post a Comment