Sunday, June 28, 2015

‘मर्डर मेस्त्री’ सिनेमाच्या गीतात एल्फी-सेल्फी अॅप


प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार नेहमीच चित्रपटाचं स्वरूप बदलत असतं. त्याला अनुसरून चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी निर्माते-दिग्दर्शकही निरनिराळ्या क्लुप्त्या लढवत असतात. अशीच एक भन्नाट कल्पना दिग्दर्शक राहुल जाधव यांनी ‘मर्डर मेस्त्री’ या आपल्या चित्रपटातील ‘जीवाला लागला घोर’ या गाण्यातून प्रेक्षकांसमोर आणली आहे.

जमाना सेल्फीचा आहे, मराठी चित्रपटसृष्टी त्यात मागे कशी राहील..? ‘मर्डर मेस्त्री’ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘एल्फी सेल्फी’ या अॅपद्वारे बनवण्यात आलेले ‘जीवाला लागला घोर’ हे गाणं दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, ऋषिकेश जोशी, विकास कदम, संजय खापरे, क्रांती रेडकर आणि मानसी नाईक यांवर चित्रित नाही तर एडीट करण्यात आले आहे.‘एल्फी सेल्फी’ या अॅपमध्ये असलेल्या व्हिडीओज् वर चित्रपटातील कलाकारांच्या सेल्फी लावण्याची शक्कल सृती सुकुमारन हिने लढवली असून हे धम्माल गाणं म्हणजे प्रेक्षकांसाठी व्हिज्युअल ट्रिट आहे.

संगीतकार पंकज पडघन यांनी पहिल्यांदाच कल्ट फोल्क सॉंग पॅटर्न हा ‘मर्डर मेस्त्री’ चित्रपटाद्वारे मराठीत आणला आहे. चित्रपटाचा क्लायमॅक्स यागाण्याने होत असल्याने त्यातले रहस्य जपत हे गाणं प्रेक्षकांना ऐकता-पाहता यावं याकरिता ही ग्राफिक ट्रीटमेंट ‘जीवाला लागला घोर’ गाण्याला दिली गेली असल्याचे दिग्दर्शक राहुल जाधव यांनी सांगितलं. गुरु ठाकूर यांचे गमतीशीर शब्द आणि आदर्श शिंदे यांचा मस्तीभरा आवाज लाभलेल्या या गाण्यात दिलीप प्रभावळकर आणि वंदना गुप्ते साल्सा करताना दिसतील तर इतरही कलाकारांचा मजेशीर अवतार तुम्ही या गाण्यात पाहू शकाल.

अब्रार नाडियादवाला आणि वैभव भोर निर्मित मर्डर मेस्त्री’ हा सस्पेन्स कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा नेहा कामत यांची आहे तर पटकथा व संवाद प्रशांत लोके यांनी लिहिलेत. नाडियादवाला जेननेक्स्ट प्रोडक्शन्स आणि व्हीटीबी एन्टरप्राईझेस यांची संयुक्त निर्मिती असलेला 'मर्डर मेस्त्री१० जुलैपासून चित्रपटगृहात दाखल होतोय.

No comments:

Post a Comment