Monday, June 1, 2015

कलाकारांच्या उपस्थितीत रंगली भव्य शोभायात्रा
दिवसेंदिवस आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अभिमानाने डौलणारी मराठी चित्रपटसृष्टीची पताका अलीकडे उंचच उंच भरारी घेतेय. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय साहित्य, कला, आणि शैलींबद्दल जाणून घेण्याची ओढ वाढत आहे. हीच बाब लक्षात घेत सुपरविस्टा एन्टरटेण्मेंटने ‘अजिंक्यतारा’ मराठी चित्रपट पुरस्काराची अलीकडेचघोषणा केली. कलाकारांच्या कलागुणांची दखल घेण्यासाठी तसेच जगभरात आपल्या अभिजात कलागुणांची उधळण करणारा हा नयनरम्य सोहळा मॉरीशस येथे होणार आहे. तत्पूर्वी मॉरीशस येथील हिंदू हाउस व वसंत भाऊ गोगटे यांच्या सहकार्याने मॉरीशसला गजानन महाराजांच्या मंदिराची स्थापना करण्यात येणार असून त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईत नुकतेच भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आले होते. आयोजक व मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत या शोभायात्रेच्या आनंदोत्सवाला उधाण आले होते.

या शोभयात्रेची सुरुवात माहीमच्या गजानन महाराजांच्या मंदिरापासून करण्यात आली होती. ढोल, ताशा, मृदुंगाच्या गजरात, लेझीमच्या तालातपालखी नाचवत शोभायात्रेची दिमाखात सुरुवात करण्यात आली. पालखी उचलण्याचा मान महापौर स्नेहल आंबेकर यांना मिळाला. याप्रसंगी मराठी चित्रपटसृष्टीतील विजय कदम, किशोरी शहाणे, अवधूत गुप्ते, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, सई ताम्हणकर, आदिती सारंगधर, राजेश भोसले, स्मिता गोंदकर, माधव देवचक्के, विशाखा सुभेदार,खासदार राहुल शेवाळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

‘अजिंक्यतारा’ मराठी चित्रपट पुरस्काराचं भव्य स्वरूप मराठी माणसांसाठी अन् महाराष्ट्रासाठीही नक्कीच भूषणावह बाब ठरेल. हा दिमाखदार सोहळा २२ ऑगस्टला मॉरीशसच्या स्वामी विवेकानंद कन्व्हेशन सेंटर या भव्य सभागृहात रंगणार आहे.

No comments:

Post a Comment