आपल्या चिरतरुण आवाजाने रसिकांना असीम आनंद देणाऱ्या आशाताईंना ऐकणं म्हणजे पर्वणीच. आशाताईंच्या सुरांची ही जादू आगामी 'मर्डर मेस्त्री' ह्या चित्रपटात ही अनुभवता येणार आहे. नुकतंच या चित्रपटातील एक गाणं आशाताईंच्या आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आलं. या गाण्यातील निरागस भाव आशाताईंच्या सुरेल आवाजाने अधिकच श्रवणीय झाले. मंदार चोळकर यांनी लिहिलेल्या या गाण्याला पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलं आहे.
'अळीमिळी गुपचिळी चिडीचूप' असे मजेशीर बोलं असलेलं हे गाणं आशाताईंनी मजेशीर नजाकतीनेचं स्वरबद्ध केलंय. या गाण्याबद्दल बोलताना आशाताई म्हणाल्या की, या गाण्याची रिदमच दमदार असल्यामुळे ते सर्वसामान्य माणसालाही गुणगुणावसं वाटेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच हे गाणं भावेल असा विश्वास ही आशाताईंनी यावेळी व्यक्त केला. आशाताईंसारख्या दिग्गजांबरोबर काम करायला मिळाल्याचा आनंदच अधिक असल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल जाधव यांनी सांगत, स्वप्नपूर्ती झाल्याची भावना यावेळी व्यक्त केली. तर आशाताईंबरोबर काम करण्याचा सुरेल योग जुळून आल्यामुळे बरेच काही शिकायला मिळाल्याचं गीतकार मंदार चोळकर व संगीतकार पंकज पडघन यांनी याप्रसंगी सांगितलं.
नाडियादवाला जेननेक्स्ट प्रोडक्शन्स आणि व्हीटीबी एन्टरप्राईझेस यांची संयुक्त निर्मिती असलेला 'मर्डर मेस्त्री' हा सिनेमा हिंदीतील प्रसिद्ध निर्माते अब्रार नाडियादवाला यांचा पहिलाच मराठी सिनेमा आहे. अब्रार नाडियादवाला आणि वैभव भोर निर्मित या चित्रपटात एखादया छोट्याशा सवयीनेसुद्धा माणसाचं आयुष्य कसं बदलू शकतं हे दाखवण्यात आलं आहे. सस्पेस्न्स कॉमेडी 'मर्डर मेस्त्री'ची कथा नेहा कामत यांची आहे तर पटकथा व संवाद प्रशांत लॊके यांनी लिहिलेत. चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जाधव यांनी केलं आहे. दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, हृषिकेश जोशी, विकास कदम, संजय खापरे, कमलाकर सातपुते, देवेंद्र भगत, क्रांती रेडकर, मानसी नाईक अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. 'मर्डर मेस्त्री'मधले रहस्य जून २०१५ मध्ये उलगडणार आहे.
No comments:
Post a Comment