Saturday, November 1, 2014

Joshi-Bedekar college's intercollegiate competetion



जोशी-बेडेकरची प्रयोगशाळा २०१४
·       विषय दिल्यानंतर चार तासांत करायचे एकांकिकेचे सादरीकरण
·       मुंबईतील १६ महाविद्यालयांचा समावेश
·       १६ नोव्हेंबरला प्राथमिक फेरी


आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा म्हणजे महिनोनमहिने तयारी, विषय ठरवण्यापासून ते एकांकिकेचं लेखन किंवा तयार एकांकिकेची शोधाशोध, बजेटची जुळवाजुळव, उशिरापर्यंत प्रसंगी लेक्चर बुडवून चालणा-या तालमी आणि मग जल्लोषात स्पर्धेच्या ठिकाणी होणारं सादरीकरण... पण यातलं काहीही न करता ऐनवेळी दिलेल्या विषयावर एकांकिका बसवण्याची वेळ आली तर? अशाच प्रकारच्या एका आगळ्यावेगळ्या एकांकिका स्पर्धेचं आयोजन ठाणे येथील जोशी-बेडेकर महाविद्यालयाने केलं आहे. महाविद्यालयाच्या ‘नाट्यमय’ या होतकरू रंगकर्मींच्या संस्थेने प्रयोगशाळा २०१४ या स्पर्धेचं आयोजन केलं असून स्पर्धक महाविद्यालयांना विषय देऊन सादरीकरणासाठी अवघ्या चार तासांचा अवधी देण्यात येणार आहे.
एकांकिका स्पर्धांचं खरं प्रयोजन विद्यार्थ्यांमधील अंगभूत गुणांना वाव देणं, त्यांच्यातील कल्पकतेला खतपाणी घालणं हे असतं. मात्र, ब-याचदा एकांकिका स्पर्धांमध्ये अव्वल येऊन बक्षिसं मिळवण्याच्या नादात हल्ली प्रयोगशीलता मागे पडत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा या प्रयोगशीलतेला चालना देण्यासाठी ‘प्रयोगशाळा २०१४’ या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
या स्पर्धेत प्रवेश घेणा-या महाविद्यालयांची प्राथमिक फेरी १६ नोव्हेंबर रोजी जोशी-बेडेकर महाविद्यालयात होईल. त्यावेळी या महाविद्यालयांना प्रत्येकी एक विषय देण्यात येईल आणि त्या विषयावरील सादरीकरणाच्या तयारीसाठी चार तासांचा अवधी दिला जाईल. कमीत कमी सामग्रीसह त्या विषयावर १५ मिनिटांचे सादरीकरण महाविद्यालयांनी करायचं आहे. या प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या पाच महाविद्यालयांची अंतिम फेरी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.

प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपये, तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment