‘टपाल’ - पोस्टमनचे सिंधुदुर्ग कनेक्शन…
आनंददायी योगायोग
सिंधुदुर्ग कन्या वर्षा सत्पाळकर निर्मित
'टपाल'च्या यशासोबत आता सिंधुदुर्गचे सुहास जाधव ठरले महाराष्ट्राचे सर्वोत्कृष्ट पोस्टमन
'मैत्रेय मास मिडीया' कंपनीच्या 'टपाल' या पहिल्या चित्रपटाच्या माध्यमातून मूळच्या कुडाळच्या निर्मात्या श्रीमती वर्षा मधुसूदन सत्पाळकर यांनी पोस्टमनच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकला. त्यांचा ‘टपाल’ हा चित्रपट सहाव्या आठवड्यातही उदंड प्रतिसादात चालू असतानाच त्या आनंदात आणखी भर टाकणारी एक बातमी कुडाळहूनच आली आहे. तेथील टपालखात्यातील पोस्टमन सुहास जाधव हे नुकतेच महाराष्ट्रातले सर्वोत्कृष्ट पोस्टमन ठरले आहेत. सिंधुदुर्गकन्या श्रीमती वर्षा मधुसूदन सत्पाळकर यांनी 'टपाल' चित्रपटाच्या निर्मितीद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करीत प्रेक्षकांची आणि समीक्षकांची विशेष प्रशंसा मिळविली. देश- विदेशातील मानाच्या महोत्सवांमध्ये सहभागी झालेल्या 'टपाल' सिनेमाला अनेक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आलं असताना त्याच सिंधुदुर्गातील सुपुत्र सुहास जाधव यांना महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट पोस्टमनचा बहुमान मिळाल्याने तमाम मराठी बांधवांसाठी नक्कीच हा दुहेरी आनंददायी क्षण आहे.
मुंबईच्या जनरल पोस्ट ऑफिस कार्यालयात महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते सुहास जाधव यांना नुकतेच या पुरस्काराने गौरविण्यात आले. गेली १७ वर्ष सर्वोत्कृष्ट सेवा देणारे पोस्टमन सुहास जाधव हे जिल्हा मुख्यालयातील सर्व कार्यालयांना परिचीत असे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेमुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 'मैत्रेय मास मिडीया'च्या वतीने 'टपाल' सिनेमाची निर्मिती करणाऱ्या निर्मात्या वर्षा मधुसूदन सत्पाळकर आणि महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट पोस्टमनचा किताब पटकाविणारे सुहास जाधव हे दोघंही सिंधुदुर्गमधील कुडाळचे आहेत हा दुर्मिळ योगायोग म्हणावा लागेल. निर्मात्या वर्षाताई यांनी 'टपाल' या पहिल्या चित्रपटात पोस्टमनच्या जीवनावर बेतलेली कथा मांडून पदार्पणातच उल्लेखनीय यश मिळवलं असून 'हृदयाला भिडणारा सिनेमा' अशी जगभरातल्या सिनेरसिकांसोबत बॉलीवूडच्या कलाकारांनी चित्रपटाची प्रशंसा केली आहे.
सिंधुदुर्गाशी नातं असणाऱ्या वर्षा सत्पाळकर यांच्या 'टपाल' सिनेमाला मिळालेल्या यशामुळे आणि सिंधुदुर्ग पोस्ट विभागाला प्रथमच सर्वोत्कृष्ट पोस्टमनचा बहुमान मिळाल्यामुळे सध्या कोकणात आनंद व्यक्त केला जातोय.
No comments:
Post a Comment