Tuesday, January 10, 2017

श्रेयस जाधव बनला पहिला मराठमोळा रॅपर



हिंदी सिनेमांमध्ये दिसून येणारे अनेक ट्रेंड आता मराठीतही रुजू लागले आहेत. मग ते चित्रपटाच्या बाबतीत असो वा संगीताच्या ! मराठी सिनेसृष्टी कुठेच मागे पडत नाही. याचे मोठे उदाहरण म्हणजे मराठमोळ्या संगीतात ‘रॅपसॉंग’चा नवा ट्रेंड लवकरच रुजू होणार आहे. अर्थात, यापूर्वी मराठीच्या काही पॉप गाण्यांमध्ये रॅपचा वापर केला असला तरी, प्रथमच एक संपूर्ण गाणे ‘रॅप'मध्ये सादर होणार आहे. आजच्या इंग्रजाळलेल्या मराठी तरुणाईला भुरळ घालणा-या '‘रॅपसॉंग' चे मराठीकरण करण्याचे काम निर्माता आणि गायक श्रेयस जाधव याने केले आहे. 
'ऑनलाईन बिनलाईन' या सिनेमाची निर्मिती करणारा श्रेयस जाधव एक चांगला रॅपर देखील आहे, या सिनेमातील 'ओ हो काय झालं’ या हरिहरन आणि लेसली लुईस यांच्या गाण्यामध्ये श्रेयसने दिलेला रॅपिंगचा तडका आजही लोकांच्या स्मरणात आहे. त्याच्या या रॅपला लोकांनी दादही दिली होती. त्यामुळे रॅपचा हा ट्रेंड चालू ठेवत, संपूर्ण रॅप असलेलं 'पुणे‘रॅप' हे गाणे तो लोकांसमोर घेऊन येत आहे. या गाण्याचे प्रत्येक बोल तरुणाईला भुरळ पाडणारे आहेत. हे गाणं पुण्याबद्दल असून ह्यात पुणेरी वैशिष्ट्यांचा उल्लेख तर आहेच पण त्यासोबतच प्रसिध्द शनिवारवाड्याचे भव्य दिव्य रूपही यात पाहायला मिळणार आहे.
हार्डकोअर पुणेकर असणाऱ्या या गाण्याचे बोल वैभव जोशी यांनी लिहिले आहे, तसेच हृषीकेश, सौरभ आणि जसराज यांचे संगीत लाभले आहे. एव्हरेस्ट इंटरटेनमेन्ट आणि गणराज प्रॉडक्शनच्या बॅनर खाली प्रसिद्ध होणारे हे पुणेरी रॅप मराठी संगीतक्षेत्राला  महत्वाचे वळण देणारे ठरणार आहे. 
संपूर्ण महाराष्ट्राच्या तरुणाईला हे गाणे ठेका धरण्यास भाग पाडेल, असा श्रेयसचा विश्वास आहे. मराठी चित्रपटाचा तरुण निर्माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रेयसची निर्मिती असणारे 'बघतोस काय मुजरा कर' आणि 'बसस्टॉप' हे दोन सिनेमे देखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. शिवाय अजून काही रॅप गाणीदेखील या वर्षात काढणार असल्यामुळे हे नवीन वर्ष श्रेयससाठी दुहेरी धमाका ठरणार आहे. श्रेयसच्या पिटाऱ्यात असलेल्या या सर्व गोष्टींचा मागोवा घ्यायचा असेल तर त्याच्या फेसबुकपेजसोबत कनेक्ट रहा, आणि आगामी गाण्यांचा तसेच सिनेमांचा आस्वाद घ्या.

No comments:

Post a Comment