Tuesday, April 28, 2015

१ मे रोजी उलगडणार हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी कर्तृत्वाची संगीतमय गाथा



मुंबई (प्रतिनिधी) - गेली अनेक वर्षं मराठी माणसावर, मराठी भाषेवर संकट ओढवल्याची ओरड होत आहे. हा मराठी माणसाचा न्यूनगंड आहे की अस्मितेचं राजकारण आहे की, खरोखरंच तशी परिस्थिती आहे, हे ज्याचं त्याने ठरवावं. पण मराठी माणसाने भारतीय समाजातील अनेक क्षेत्रं आपल्या अंगभूत कौशल्याने समृद्ध केली आहेत. मग ते खगोलशास्त्र असो (डॉ. जयंत नारळीकर, डॉ. वसंत गोवारीकर), क्रीडा क्षेत्र असो (सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, अंजली भागवत) किंवा सामाजिक क्षेत्र असो (विनोबा भावे, बाबा आमटे). चित्रपटसृष्टीही याला अपवाद नाही. आज हजार कोटींच्या वर उलाढाल गेलेल्या या उद्योगाचा पायाच दादासाहेब फाळके या मराठी माणसाने रचला होता. त्यानंतर चित्रपटांच्या गेल्या १०० वर्षांच्या इतिहासात दादा करंदीकर (छायालेखक), व्ही. शांताराम, एन. चंद्रा (दिग्दर्शक), लता मंगेशकर, आशा भोसले (गायिका), मास्टर भगवान, अमोल पालेकर, स्मिता पाटील, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर (अभिनेते), सी. रामचंद्र, सुधीर फडके, वसंत देसाई, अजय-अतुल (संगीतकार), स्वानंद किरकिरे (गीतकार), मनोहर आचरेकर, नितीन देसाई (कला दिग्दर्शक), एम. एस. शिंदे (संकलक) अशा अनेक दिग्गज कलावंत/तंत्रज्ञांनी ही चित्रपटसृष्टी समृद्ध केली आहे.
त्यांच्या याच योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १ मेच्या महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. अतुल दाते यांची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेल्या या कार्यक्रमात हिंदी चित्रपटसृष्टीतील गेल्या १०० वर्षांतील मराठी माणसांच्या योगदानाचा संगीतमय आलेख मांडण्यात येणार आहे. चित्रपती व्ही. शांताराम यांच्यापासून आजच्या काळातले स्वानंद किरकिरे आणि अजय-अतुल यांच्यापर्यंत मराठी माणसाची ही हिंदीतली यशोगाथा उलगडणार आहे. १ मे रोजी रवींद्र नाट्यमंदिर येथे ४ ते ७ या वेळेत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती अतुल दाते यांनी दिली. अधिक माहितीसाठी संपर्क : ९८६७२ ००७०९.


No comments:

Post a Comment